अमेरिकेत कोरोनाचे एक लाख बळी

बाल्टिमोर – जगभरात कोरोनाव्हायरसने दगावलेल्यांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून एकट्या अमेरिकेत या साथीने एक लाख जणांचा बळी घेतला आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाखांच्या पुढे गेली असून यापैकी ७४ टक्के कोरोनाबाधित बारा देशांमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २४,६०,८४१ जण या साथीतून बरे झाले आहेत. मात्र जगभरात कोरोनाची लक्षणे नसलेले पण या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे चीन, दक्षिण कोरियाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीतून समोर येत आहे.

जगभरातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३,५३,६२१ वर गेली असून यात गेल्या चोवीस तासातील ४,०५५ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी या साथीने अमेरिकेत ६५७ जणांचा बळी घेतला. त्यामुळे अमेरिकेतील एकूण बळींची संख्या १,००,५८० वर पोहोचली आहे. जगभरातील कोरोनाच्या एकूण बळींपैकी ३३ टक्के बळी एकट्या अमेरिकेत गेल्याची माहिती, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेतील बळींची संख्या सातशेच्या खाली आल्याचे या विद्यापीठाने निदर्शनास आणून दिले. चोवीस तासात युरोपात या साथीच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी २०९ जणांचा बळी गेला. अमेरिका आणि युरोपमध्ये साथीच्या बळींची संख्या घटत असताना ब्राझीलमध्ये मात्र एका दिवसात १,०३९ जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाचे ९१,९४० नवे रुग्ण आढळले असून या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या ५७,२७,५२२ वर पोहोचली आहे. चोवीस तासात अमेरिकेत या साथीचे १९ हजाराहून अधिक तर ब्राझीलमध्ये १६,३२४ आणि युरोपात १५ हजारांच्याही पुढे रुग्ण आढळले आहेत. रशियात एकाच दिवसात ८,३३८ नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिका, ब्राझील, रशिया व युरोपीय देश वगळता भारत, तुर्की आणि इराण या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या बारा देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ लाखांवर पोहोचली आहे.

लॅटिन अमेरिका या साथीचे नवे केंद्र ठरले असून येथील १४ देशांमध्ये ३४ हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या सात लाखांच्या जवळ पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी ब्राझील, पेरू आणि इक्वेडोर या तीन देशांमध्ये सर्वाधिक बळी आणि रुग्ण सापडल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने आपल्या माहितीत म्हटले आहे. असे असले तरी, व्हेनेझुएला आपल्या देशातील कोरोनाच्या रुग्णांची आणि बळींची माहिती दडवित असल्याचा आरोप मानवाधिकार संघटना आणि जॉन ऑफिस विद्यापीठाने केला आहे. आपल्या देशात या साथीने ११ जणांचा बळी घेतला असून फक्त बाराशे रुग्ण आढळल्याचे राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी जाहीर केले आहे. मात्र मदुरो यांची राजवट देशातील खरी परिस्थिती लपवीत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करीत आहे.

दरम्यान, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पण कोरोनाबाधित असलेले तब्बल ३०० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. चीनच्या वुहान शहरात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये असे किमान दोनशे नवे रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तर दक्षिण कोरियामध्ये किमान सव्वाशे रुग्ण आढळल्याचे घोषित करण्यात आले आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सहजासहजी दिसत नसल्यामुळे कोरोनाची ही नवी लाट पुढच्या काळात अधिक भयंकर स्वरुप धारण करू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

leave a reply