आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून १० हजार किलो अमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली – आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत १०६७५ किलो अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मारिजुआनाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जाते.

अमली पदार्थ

कर्नाटकच्या रामपुरा गावात चार एकर जमीनीवर मारिजुआनाची शेती करून त्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ९ हजार ८७२ किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत चार कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

रामपुरामध्ये चार एकर जमीनीवर मारिजुआनाची शेती चालते याची माहिती मिळताच पोलिसांनी या जमिनीच्या तीन मालकांना अटक केली होती. दोन वर्षांपूर्वी या तिघांनी ही जमिन एका दलालाच्या मध्यस्थीने भाडेतत्वावर रूद्रेश याला दिली होती, अशी माहिती या तिघांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या शेतावर धाड टाकली. या छप्प्यात ९ हजार ८७२ किलोचा गांजा जप्त केला. रूद्रेश गांजाची शेती करून त्याची तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, बुधवारी आंध्र प्रदेशहून ओडिशाच्या दिशेने एका ट्रकमधून ६७५ किलो गांजा पकडण्यात आला. मंगळवारपासून शहरात पाऊस सुरू असल्यामुळे विझियानग्रामच्या कोडुपम पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस ट्रॅफिक मोकळा करण्याचे काम करीत होते. या ट्रॅफिक जॅममध्ये हा ट्रक अडकला होता. पोलिसांना पाहून ट्रकचा ड्रायव्हर तिथून निसटला. या ट्रकची तपासणी केली असता केबीनमध्ये ६७५ किलोचे गांजा सापडला. ट्रकवर पश्चिम बंगालची नंबर प्लेट होती. या प्रकरणाची चौकशी चालू असून लवकरच दोषींना पकडले जाईल, अशी माहिती आंध्र प्रदेशच्या पार्वतीपूरम सर्कल पोलीस निरीक्षक सी. एच लक्ष्मणराव यांनी दिली आहे.

leave a reply