महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे ६३ हजार नवे रुग्ण

- ३४९ जण दगावले

नवे रुग्णनवी दिल्ली/मुंबई – रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ६३ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. तसेच ३४९ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात चोवीस तासात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या उच्चांकाने चिंतेत अधिकच भर टाकली आहे. सोमवारी राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेऊ शकते, असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी मंत्रिमंडळाची बैठकही बोलाविण्यात आली आहे. देशात शनिवारपासून रविवारच्या सकाळपर्यंत तब्बल १ लाख ५२ नवे रुग्ण आढळले. यात महाराष्ट्रातील रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. चोवीस तासात दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले भारत जगातील दुसरा देश ठरला आहे.

देेशात कोरोना रुग्णांच्या ऍक्टिव्ह केसेस ११ लाखांच्याही पुढे गेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ३४ लाखांच्या पुढे गेली असून या साथीत बळी गेलेल्यांची संख्या ५८ हजारांवर पोहोचली आहे. देशात या साथीने सर्वाधिक बळी महाराष्ट्रातच गेले आहेत. देशात आतापर्यंत एकूण एक लाख ६९ हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ६३ हजार २९४ नवे रुग्ण आढळले, तसेच ३४९ जण दगावले. मुंबईत १० हजार रुग्ण आढळले असून ५८ जणांचा बळी गेला अहे. पुणे शहरात ६ हजार ६७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४८ जणांचा बळी गेला. नागपूरात ७ हजार नवे रुग्ण आढळले आणि ६३ जणांचा मृत्यु झाला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर आज विविध बैठका पार पडल्या.

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. तर रविवारी कृतीदलाबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंधांचे स्वरुप, त्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर आठ ते १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय सरकार घेईल, असे स्पष्ट झाले आहे. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय होईल. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन लागू शकतो, अशा बातम्या आहेत.

देेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सात राज्यात आढळत आहेत. तसेच सोळा राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रानंतर छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ या राज्यांचा समावेश आहे. रविवारी दिल्लीत सुमारे ११ हजार नवे रुग्ण आढळले, कर्नाटकात १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशात १५ हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून आतापर्यंत उत्तर प्रदेशात एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कंेंद्र सरकारकडून राज्यांना सातत्याने सूचना करण्यात येत असून काही राज्यांमध्ये केंद्रीय पथकेही पाठविण्यात आली आहेत.

leave a reply