गलवान संघर्षाचा भारत-चीनमधील संबंधावर विपरित परिणाम

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – १९९३ सालापासून भारत आणि चीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करार पार पडले. या करारांमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्यतैनातीची मर्यादा आणि सैनिकांच्या कारवायांचे नियम निश्चित झाले होते. पण १५ जून रोजी लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षामुळे भारत-चीन संबंधावर विपरित परिणाम झाला आहे, अशा शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय जनतेमध्ये चीनविरोधात खदखदत असलेल्या असंतोषाची जाणीव करुन दिली. त्याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनची मोठी सैन्यतैनाती भारताच्या सुरक्षेला गंभीर आव्हान ठरत असून भारतीय संरक्षणदलांची त्यावर करडी नजर असल्याचे जयशंकर यांनी बजावले आहे.

गलवान संघर्ष

गेल्या ३० वर्षांच्या काळात भारताने चीनशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे हा या संबंधांमागील उद्देश होता. यासाठी भारत आणि चीनमध्ये या काळात वेगवेगळ्या प्रकारचे करार झाले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्यतैनाती मर्यादित करून व दोन्ही सैनिकांचे व्यवहार या करारातून निश्चित करून या भागात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला गेला. सैधांतिक पातळीपासून वर्तणुकीच्या पातळीपर्यंत संपूर्ण चौकट तयार करण्यात आली होती. पण यावर्षी गलवानच्या खोर्‍यात चीनने जे काही केले ते पाहता चीनने या करारांमधून माघार घेतल्यासारखे आहे, असा आरोप परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात लष्कराची जमवाजमव करुन भारताबरोबरच्या करारांचे उल्लंघन केल्याचा ठपका परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला. ही सैन्यतैनाती वाढवित असताना, १५ जून रोजी गलवानच्या खोर्‍यात जे काही घडले त्याचा भारतातील जनता आणि राजकारणावर खोलवर परिणाम झाला आहे. १९७५ सालानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांचा बळी गेला असून यामुळे भारत व चीन संबंधात मोठी उलथापालथ झाल्याची जयशंकर यांनी जाणीव करुन दिली. त्याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तसेच शस्त्रास्त्रे तैनात करुन चीनने भारताच्या सुरक्षेला आव्हान दिल्याची टीका परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

leave a reply