अफगाण-पाकिस्तान सीमा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनत आहे

- ग्रीसच्या वर्तमानपत्राचा इशारा

जागतिक दहशतवादाचेइस्लामाबाद – तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून अफगाणिस्तान-पाकिस्तानची सीमा पुन्हा एकदा जागतिक दहशतवादाचे पहिल्या क्रमांकचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. अमेरिका आणि नाटोच्या जवानांनी माघार घेतल्यामुळे अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांवरील हल्ले वाढले असून येत्या काळात त्यात भयानक प्रमाणात वाढ होईल, असा इशारा आघाडीच्या ग्रीसच्या वर्तमानपत्राने दिला.

गेल्या आठवड्यात कुंदूझ येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा दाखला ग्रिक वर्तमानपत्राने दिला. हा हल्ला म्हणजे अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ले वाढत असल्याचे संकेत देणारा होता, असा दावा सदर वर्तमानपत्राने केला. आयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण यामुळे अफगाणिस्तानातील अल कायदा व त्यांच्याशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढत असल्याचा इशारा लष्करी विश्‍लेषकांनी दिला होता, याकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

अफगाण-पाकिस्तानच्या स्पिन बोल्दाक आणि कंदहार सीमेवरील हिंसाचाराच्या बातम्या दडपण्यात आल्याचे ग्रीसच्या वर्तमानपत्राने लक्षात आणून दिले. पाकिस्तानच्या वझिरिस्तान व इतर सीमाभागात तेहरिक-ए-तालिबान ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्करावर मोठ्या प्रमाणात हल्ले चढवित आहेत. यामध्ये पाकिस्तानी जवानांचा बळी जात आहे. यातील काही गटांशी पाकिस्तानने चर्चा सुरू केल्याची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. पण तेहरिकचे हल्ले काही थांबलेले नाहीत, अशी माहिती सदर वर्तमानपत्राने दिली.

अफगाण-पाकिस्तानला विभागणारी ड्युरंड सीमा आपल्याला मान्य नसल्याची धमकी तालिबानचे नेते देत आहेत. तालिबान आणि तेहरिक या दोन्ही दहशतवादी संघटना वैचारिकदृष्ट्या जोडलेल्या आहेत, याची आठवण ग्रीसच्या वर्तमानपत्राने करुन दिली. त्यात तालिबानने तेहरिकच्या मुद्यावर पाकिस्तानशी सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका वाढला आहे.

अशा परिस्थितीतही, अफगाणिस्तानातील मानवतावादी संकट आणि अफगाणी जनतेच्या दुर्दशेचा दाखला देऊन आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानचा तालिबानला असलेला हा पाठिंबा या क्षेत्रातील समस्या वाढविणारा असल्याचे सदर वर्तमानपत्राने बजावले आहे.

leave a reply