अफगाणी सुरक्षादलांच्या कारवाईत १५२ पाकिस्तानी दहशतवादी ठार

काबूल – तालिबानविरोधात अफगाणी सुरक्षादलांनी हेल्मंड आणि कंदहार प्रांतात केलेल्या जोरदार कारवाईत ७० तालिबानी कमांडर ठार झाले आहेत. त्याचवेळी १५२ पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेल्याचे अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याचा दावा याआधी संयुक्त राष्ट्रसंघांच्या अहवालात करण्यात आला होता. याचा स्पष्ट पुरावा या कारवाईमुळे समोर आला आहे.

पाकिस्तानी दहशतवादी

अफगाणिस्तानच्या हेल्मंड आणि कंदहारमध्ये गेल्या महिन्यात तालिबानने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार माजविला होता. गेल्या २५ दिवसात तालिबानच्या हल्ल्यात १३४ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणी सुरक्षादलांनी तालिबानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार कारवाई हाती घेतली होती. यामध्ये ७० तालिबानी कमांडर्स ठार झाले. तसेच मोठ्याप्रमाणावर तालिबानी दहशतवादीही मारले गेले. यामध्ये १५२ पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरिन म्हटले आहे.

तारिक अरिन ठार झालेल्या तालिबानी कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादीही प्रसिद्ध केली. अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात सुरक्षादलाने तालिबानचे २० कमांडर्सचा ठार केले. कंदहारमध्ये तालिबानचे ४० कमांडर्स, तर उर्झुगन, आणि गझनीमध्ये १० कमांडर ठार झाले, अशी माहिती अरिन यांनी दिली.

दरम्यान, रविवारी रात्री अफगाणिस्तानमधल्या कुंदूझमधल्या ‘दश्त-ए- अर्ची’ जिल्ह्यात अफगाणी सुरक्षादल आणि तालिबानमध्ये तीव्र संघर्ष भडकला. तालिबानने या जिल्ह्यातल्या अफगाणी सुरक्षा दलाच्या चौक्यांवर हल्ले चढविले असून यात सुरक्षा दलाचे तीन जवान ठार झाले. या संघर्षात अफगाणी वायुसेनाही सहभागी झाली होती. तर या संघर्षात आठ तालिबानी ठार झाले असून १३ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

leave a reply