तालिबानमुळे अफगाणिस्तान निर्णायक टप्प्यावर उभा आहे

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचा इशारा

निर्णायक टप्प्यावरकाबुल – ‘अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना केली जाईल, महिलांना त्यांचे अधिकार मिळतील याबाबात तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्‍वासने मोडली आहेत. तालिबानमुळे अफगाणिस्तान या घडीला निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे’, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी दिला. अफगाणिस्तानला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केले.

तालिबानने काबुलचा ताबा घेण्याआधी केलेल्या आश्‍वासनांचे पालन केले नाही, असा ठपका गुतेरस यांनी ठेवला. महिला, मुलींना शिक्षणाचा अधिकार, रोजगार तसेच व्यवसाय करण्याची संधी नाकारुन तालिबानने सार्‍या जगाची फसवणूक केल्याची टीका महासचिव गुतेरस यांनी केली. पण तालिबानच्या या चुकीची शिक्षा अफगाणी जनतेला मिळता कामा नये, अशी शिफारस राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली.

निर्णायक टप्प्यावर‘अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ही सध्या मोठ्या संकटात आहे. महिलांना त्यांचे अधिकार दिल्याशिवाय अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि समाजात सुधारणा होऊ शकत नाही’, याची जाणीव महासचिव गुतेरस यांनी करून दिली. अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य करणे आवश्यक असल्याचे सांगून गुतेरस यांनी तालिबानच्या राजवटीला मान्यता देणे हा पूर्णपणे स्वतंत्र मुद्दा असल्याचे स्पष्ट केले.

तालिबानला मान्यता नाकारून, निर्बंधातून मोकळीक न देताही आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य केले जाऊ शकते, असे गुतेरस यांनी सुचविले. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेगवेगळ्या संघटना, जागतिक बँक आणि जी२० बैठकीत सहभागी होणार्‍या देशांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी आवाहन केले. ‘अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था वाचविण्याची जबाबदारी या देशावर हुकूमत निर्णायक टप्प्यावरअसणार्‍यांचीच आहे. पण सध्याच्या या आर्थिक वादळातून आपणच अफगाणींना बाहेर काढले नाही, तर येत्या काळात अफगाणींनाच नाही तर जगाला त्याची किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दिला.

दरम्यान, अफगाणिस्तानातील महिला-मुलींना अधिकार नाकारणार्‍या तालिबानविरोधात जगभरात निदर्शने सुरू आहेत. अफगाणी महिलांच्या सध्याच्या या स्थितीसाठी तालिबान तसेच तालिबानला समर्थन करणारा पाकिस्तान देखील तितकाच जबाबदार असल्याची टीका अफगाणी महिला कार्यकर्त्या खालिदा नवाबी यांनी केला. पाकिस्तानकडून तालिबानला मिळणारा पाठिंबा वेळीच रोखले नाही, तर जगाला ९/११पेक्षा भीषण परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा नवाबी यांनी दिला आहे.

leave a reply