तालिबानबरोबरील चर्चेवरून अफगाणी राजदूतांचा भारताला सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली – अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झालेली असताना, अफगाणिस्तानात तालिबानची लष्करी आगेकूच सुरू झाली आहे. यामुळे लवकरच अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येईल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत भारताने तालिबानशी चर्चा सुरू केली असून तसे संकेत परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. कतारने देखील भारत व तालिबानमध्ये आपण चर्चा घडवून आणल्याची माहिती उघड केली व तालिबानच्या काही नेत्यांनी त्याला दुजोरा दिला. पण भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुन्दजई यांना भारताला सावधानतेचा इशारा दिला. भारतात घातपात माजविणार्‍या दहशतवादी संघटनांना तालिबान सहाय्य करीत आहे, याकडे अफगाणी राजदूतांनी लक्ष वेधले.

तालिबानबरोबरील चर्चेवरून अफगाणी राजदूतांचा भारताला सावधानतेचा इशाराअफगाणिस्तानच्या उभारणीत भारताला फार मोठे स्थान आहे. खडतर काळात अफगाणी जनतेला भारताने फार मोठे सहाय्य केले होते, असे राजदूत ममुन्दजई यांनी म्हटले आहे. मात्र सध्या भारत तालिबानशी चर्चा करीत आहे का, याविषयी आम्हाला माहिती नसल्याचे सांगून ममुन्दजई यांनी याबाबत थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माध्यमांशी बोलताना राजदूत ममुन्दजई यांनी तालिबानकडे आपला देश दहशतवादी म्हणूनच पाहत असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी भारताच्या सुरक्षेलाही तालिबानपासून धोका संभवतो, याकडेही ममुन्दजई यांनी लक्ष वेधले.

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ला असो, 2001 साली भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला असो किंवा 2016 सालचा पठाणकोटमधील हल्ला, 2019 सालचा पुलवामा येथील घातपात या सार्‍यांमध्ये गुंतलेल्या दहशतवादी संघटनांना तालिबानचे सहाय्य मिळत आहे, असे ममुन्दजई म्हणाले. म्हणूनच अशा दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणार्‍या तालिबानला भारतासह सर्वच देशांनी योग्य तो संदेश द्यावा. दहशतवादी संघटनांबरोबरील संबंध तालिबानने तोडावी, अशी मागणी करावी, अशी अपेक्षा राजदूत ममुन्दजई यांनी व्यक्त केली.

leave a reply