अफगाणिस्तान अस्थिर होऊ देणार नाही

- राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचे अफगाणींना आश्‍वासन

अस्थिरकाबुल – ‘आज अफगाणींना स्वत:च्या वर्तमान आणि भविष्याची धास्ती वाटत आहे. पण तुमचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी आश्‍वस्त करतो की अफगाणिस्तानला अधिक अस्थिर होऊ दिले जाणार नाही. यापुढे अफगाणी जनता विस्थापित होणार नाही. यासाठी मी देशातील व विदेशी नेत्यांशी चर्चा सुरू केली असून लवकरच याचे परिणाम तुमच्यासमोर येतील’, असा संदेश अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दिला. तालिबानचे दहशतवादी राजधानी काबुलपासून 10 किलोमीटर अंतरावर पोहोचले आहेत. राष्ट्राध्यक्ष गनी हे अफगाणिस्तान सोडून पळून गेले आहेत व पुढच्या काही तासात तालिबान काबुलचा ताबा घेतील, असा प्रचार पाकिस्तानने सुरू केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गनी यांनी अफगाणी जनतेला केलेले आवाहन महत्त्वाचे ठरते. दरम्यान, अमेरिकेचे तीन हजार मरिन्स शनिवारी सकाळीच काबुलमध्ये दाखल झाले आहेत.

अस्थिरअफगाणिस्तानच्या दोन तृतियांश भूभागावर तालिबानने आपली राजवट प्रस्थापित केली आहे. 34 पैकी 18 प्रातांच्या राजधान्यांचा ताबा घेणारे तालिबानचे दहशतवादी काबुल प्रांताच्या सीमेत दाखल झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पुढच्या 72 तासात राजधानी काबुल तालिबानच्या ताब्यात जाईल, असा दावा अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने काही तासांपूर्वी केला. त्यातच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी आखाती देशात तर उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह ताजिकिस्तानात पळून गेल्याचा अपप्रचार पाकिस्तानातून सुरू झाला होता.

पण शुक्रवारी सालेह आणि शनिवारी राष्ट्राध्यक्ष गनी यांनी अफगाणी जनतेला संबोधित करून पाकिस्तानचा अपप्रचार हाणून पाडला. गेले काही महिने तालिबानचे दहशतवादी व त्यांच्या समर्थकांविरोधात शौर्याने लढणाऱ्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्या अफगाणी जवानांचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी आभार मानले. सध्याच्या कठिण काळात अफगाणिस्तानची सुरक्षा आणि संरक्षणदलांची पुनर्बांधणी आपल्यासाठी प्राथमिकता असून त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना सुरू असल्याचे गनी म्हणाले.

अस्थिर‘गेल्या 20 वर्षांमध्ये अफगाणी जनतेने कमावलेली शांती, स्थैर्य, खाजगी मालमत्तेचा विध्वंस होऊ देणार नाही. अफगाणींवर युद्ध लादले जाणार नाही’, असे सांगून गनी यांनी देशांतर्गत तसेच परदेशी नेते, आंतरराष्ट्रीय संस्थांशी चर्चा सुरू केल्याचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी जाहीर केले. शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी काही राजकीय व टोळीप्रमुखांशी चर्चा केल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले. तर कतारचे परराष्ट्रमंत्री अल-थानी यांनी दोहा येथील बैठकीत तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर याची भेट घेऊन संघर्षबंदीचे आवाहन केले.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या सीमेजवळील पाकतिकाची राजधानी शरना ताब्यात घेतले. तर कंदहारमधील आणखी एक रेडिओ स्टेशन तालिबानने नियंत्रणाखाली आणले. अफगाणिस्तानच्या पश्‍चिमेकडील मझार-ए-शरिफ शहरासाठी तालिबानने मोठी मोहीम छेडली आहे. मझार-ए-शरिफची सुरक्षा अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि प्रभावी टोळीप्रमुख रशिद दोस्तम यांच्याकडे आहे. दोस्तम आणि राष्ट्राध्यक्ष गनी हे तालिबानच्या हिटलिस्टवर असल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अमेरिकेचे तीन हजार मरिन्स शनिवारी पहाटे राजधानी काबुलमध्ये दाखल झाले आहेत. काबुलमधील अमेरिकेचे दूतावास व त्यातील आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षित माघारीसाठी ही तैनाती असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी स्पष्ट केले. याची तयारी सुरू झाली असून अमेरिकन दूतावासातील संवेदनशील माहिती नष्ट करण्यात येत आहेत. याआधीच अफगाणिस्तानात अमेरिकेचे आधीच 650 जवान तैनात आहेत. तर पुढच्या काही तासात तालिबानने काबुलमधील अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका पोहोचविला तर कतार आणि कुवैतमध्ये अमेरिकेचे सुमारे 3500 जवान पुढील कारवाईसाठी तयार बसल्याची माहिती किर्बी यांनी दिली.

leave a reply