पाकिस्तानच्या आगळीकीनंतर भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी ‘एससीओ’ बैठक सोडली

नवी दिल्ली/मॉस्को – आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व बाजूनी नकारघंटा मिळत असतानाही प्रत्येक जागी काश्मीर मुद्दा उकरून काढण्याची पाकिस्तानची खोड अद्याप मोडली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या ‘एन एसए’च्या ‘व्हर्च्युअल’ बैठकीत पाकिस्तानने भारताच्या जम्मू-काश्मीरचा समावेश असलेला नवा ‘पॉलिटिकल मॅप’ दाखवून नवी कुरापत काढली. मात्र भारताचे ‘एनएसए’ अजित डोवल यांनी थेट बैठकीतून बाहेर पडत पाकिस्तानच्या या कुरापतीला सणसणीत चपराक लगावली. याप्रकरणी भारताने आयोजक देश असणाऱ्या रशियाकडेही तीव्र नाराजी वर्तविली असून, रशियानेही पाकिस्तानला समज दिल्याचे समोर आले आहे.

'एससीओ' बैठक

मंगळवारी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोना साथीमुळे ही बैठक व्हर्च्युअल घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी आपल्या खुर्चीमागे नवा ‘पॉलिटिकल मॅप’ लावल्याचे दिसून आले. ही गोष्ट लक्षात येताच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल तीव्र निषेध नोंदवून बैठकीतून बाहेर पडले. डोवल यांनी आपली नाराजी रशियन ‘एनएसए’ निकोलाय पत्रुशेव्ह यांच्याकडेही व्यक्त केली.

भारताच्या परराष्ट्र विभागाने या घटनेची कडक शब्दात दखल घेतली असून पाकिस्तानला फटकारले आहे. ‘पाकिस्तानची कृती बैठकीच्या नियमांचे उल्लंघन असून आयोजक देश असणाऱ्या रशियाकडून देण्यात आलेल्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे. भारताने रशियाशी सल्लामसलत करूनच बैठक सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पाकिस्तानने बैठकीत चुकीची माहिती पसरविणे सुरु ठेवले’, असे भारताच्या परराष्ट्र विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. पाकिस्तानच्या या आगळीकीवर रशियानेही तीव्र नाराजी व्यक्त केली.

रशियाचे एनएसए पत्रुशेव्ह यांनी, पाकिस्तानची कृती चिथावणीखोर होती, अशा शब्दात समज दिल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी पाकिस्तानच्या भूमिकेला रशियाचे समर्थन नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

leave a reply