अफगाणिस्तानात तालिबानने मिळविलेल्या आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर

- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्र

वॉशिंग्टन/काबुल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून वेगाने घेतलेल्या माघारीवर अमेरिकेतून जळजळीत टीका करण्यात येत आहे. तालिबानकडून एकामागोमाग शहरे ताब्यात घेण्यात असून या पार्श्‍वभूमीवर टीकेची धार अधिकच तीव्र झाली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने मिळविलेल्या आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्रमाजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानची जबाबदारी असणारे वरिष्ठ अधिकारी डेव्हिड सिडनी यांनी, बायडेन यांच्या निर्णयानंतर इतर कोणताही देश अमेरिकेवर विश्‍वास ठेवणार नाही, असा ठपका ठेवला आहे. तर अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील माजी राजदूत रायन क्रॉकर यांनी, बायडेन यांनी अफगाणिस्तान तालिबानला ‘हँडओव्हर’ केल्याची टीका केली आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अफगाणिस्तानमधील आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या ज्यो बायडेन यांनीही सैन्यमाघारीचा निर्णय कायम ठेवला. मात्र मे महिन्याऐवजी सप्टेंबर महिन्यापर्यंत माघारी पूर्ण होईल, असे जाहीर केले.

अमेरिका व नाटो देशांच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र माघारीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच तालिबानने जवळपास 80 टक्क्यांहून अधिक अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याचे सांगण्यात येते. शनिवारी तालिबान राजधानी काबुलपासून काही मैलांच्या अंतरावर येऊन ठेपल्याचे दावे करण्यात येत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने तालिबानला रोखणे अपेक्षित असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन सुट्टी घालविण्यासाठी ‘कॅम्प डेव्हिड’ या ठिकाणी गेल्याचे समोर येत आहे. तालिबान अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळविण्याची शक्यता असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या सुट्टीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने मिळविलेल्या आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्रओबामा यांच्या कार्यकाळात संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या डेव्हिड सिडनी यांनी, अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या धोरणावर टीकास्त्र सोडले आहे. ‘अमेरिकेच्या या माघारीने मित्रदेशांना संदेश दिला आहे. अमेरिकेवर विश्‍वास ठेऊ नये हा संदेश मित्रदेशांना मिळाला असेल’, असे सिडनी म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिलेल्या रायन क्रॉकर यांनी, तर अमेरिकेची माघारी म्हणजे अफगाणिस्तान तालिबानला ‘हँडओव्हर’ करण्याची प्रक्रिया होती, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

‘अफगाणिस्तानला आपण वाऱ्यावर सोडले, अशी अफगाण सरकारची भावना झाली आहे आणि ती खरी आहे. आपण त्यांच्या शत्रूशी करार केला आहे’, अशी जळजळीत टीका माजी राजदूत क्रॉकर यांनी केली.

अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील राजदूत अदेला राझ यांनीही, बायडेन प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. उर्वरित जगाच्या शांती व सुरक्षेसाठी अफगाणिस्तानला एकट्याने तालिबानविरोधात संघर्षासाठी सोडून देण्यात आले, अशी टीका राझ यांनी केली.

वॉशिंग्टन पोस्टमधील पत्रकार व लेखक क्रेग व्हिटलॉक यांनी, अफगाण मुद्यावरून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य केले आहे. व्हिटलॉक यांनी लिहिलेले पुस्तक ‘द अफगाणिस्तान पेपर्स: ए सिक्रेट हिस्ट्री ऑफ वॉर’ या महिन्याच्या अखेरीस प्रकाशित होत आहेत. त्यात त्यांनी, 2014 साली अफगाणिस्तानच्या संघर्षावर माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी केलेले वक्तव्य खोटे होते, असा शेरा मारला आहे. ओबामा यांनी त्यावेळी अफगाणिस्तानातील संघर्षाची अखेर होत असल्याचे म्हंटले होते. मात्र हे वक्तव्य म्हणजे अमेरिकी जनतेची घोर फसवणूक होती, असा दावा व्हिटलॉक यांनी केला. या वक्तव्यानंतर जवळपास सात वर्षे अफगाणिस्तानातील युद्ध चालू राहिले व त्यात अमेरिकन्सचे बळी गेले, अशा शब्दात त्यांनी ओबामा यांची खरडपट्टी काढली.

leave a reply