वायुसेनेचे १७ स्क्वाड्रन व लष्कराच्या शीख लाईट इंफन्ट्रीमध्ये करार

स्क्वाड्रनअंबाला – सुरक्षाविषयक आव्हानांची व्याप्ती वाढत असताना, याला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षणदलांमधील समन्वय व सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. यानुसार सोमवारी भारतीय वायुसेनेचे १७वे स्क्वाड्रन आणि भारतीय लष्कराच्या शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट यांच्यातील संलग्नतेसंदर्भातील करारावर सोमवारी स्वाक्षर्‍या पार पडल्या. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या उपस्थितीत याचा कार्यक्रम पार पडला.

लडाखच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैन्याबरोबरच वायुसेने देखील या क्षेत्रात चीनला भारतावर वर्चस्व गाजविण्याची संधी मिळणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. एलएसीवरील हवाई क्षेत्र भारतीय वायुसेनेच्या नियंत्रणात असल्याची ग्वाही तत्कालिन वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिली होती. या काळात लष्कर व वायुसेनेमधील समन्वय व सहकार्य अधिक दृढ करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली. संरक्षणदलांची संघटीत कारवाई अशा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून संरक्षणदलप्रमुख जनरल रावत, लष्करप्रमुख जनरल नरवणे, तत्कालिन वायुसेनाप्रमुख भदौरिया व नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी ‘युनिफाईड थिएटर कमांड’च्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.

स्क्वाड्रनसोमवारी अंबाला येथील वायुसेनेच्या तळावर वायुसेनेचे १७वे स्क्वाड्रन आणि भारतीय लष्कराच्या शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट यांच्यात झालेला हा करार, युनिफाईड थिएटर कमांडच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे बोलले जाते.१९६५ व १९७१ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात वायुसेनेचे १७वे स्क्वाड्रन आणि भारतीय लष्कराच्या शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटने अत्यंत प्रभावी कामगिरी करून दाखविली होती. त्यामुळे या कराराचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

दरम्यान, वायुसेनेच्या १७ व्या स्क्वाड्रनच्या ताफ्यात फ्रान्सकडून खरेदी केलेली अत्याधुनिक रफाय लढाऊ विमाने सहभागी करण्यात आलेली आहेत. म्हणूनच सदर कराराला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे. चीनचे लष्कर भारताच्या हद्दीत घुसखोरी करून दडपण वाढविण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत आहे. तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानेही काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर, एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर युद्धाची सज्जता भारताने ठेवलेली आहे. अशा काळात संरक्षणदलांकडील साधने व स्त्रोत यांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याचे ध्येय संरक्षणदलांनी आपल्या समोर ठेवले आहे. वायुसेनेच्या १७ व्या स्क्वाड्रन व लष्कराच्या शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये झालेले सहकार्य ही त्याची सुरूवात असून पुढच्या काळात संरक्षणदलांमधील समन्वय व सहकार्य वाढविणारे अशा स्वरुपाचे करार समोर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply