तालिबान-रशिया मध्यस्थीचे दावे समोर येत असतानाच अहमद मसूदकडून पंजशीरमध्ये तालिबानविरोधी संघर्षाला सुरुवात झाल्याची घोषणा

पंजशीरपंजशिर/काबुल – तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याची व युद्ध संपल्याची घोषणा केली असली, तरी वास्तव वेगळे असल्याचे समोर येत आहे. काबुलपासून सुमारे सव्वाशे किलोमीटर्स अंतरावर असलेल्या पंजशीर प्रांतात ‘नॉर्दर्न अलायन्स’च्या नेतृत्त्वाखाली तालिबानविरोधी गट मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. या भागातील नवा संघर्ष टाळण्यासाठी तालिबानने रशियाच्या मध्यस्थीने प्रस्ताव पाठविल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र त्याबाबत चर्चा होण्यापूर्वीच ‘नॉर्दर्न अलायन्स’चे संस्थापक अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद याने ‘द रेझिस्टन्स हॅज जस्ट बिगन’ची घोषणा करीत तालिबानविरोधी लढ्याची सुरुवात झाल्याचे जाहीर केले आहे.

तालिबानने गेल्या रविवारी राजधानी काबुलमध्ये प्रवेश करून संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी युद्ध संपल्याचे सांगून सरकारस्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाल्याचेही सांगितले होते. मात्र संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याचा तालिबानचा दावा खरा नसून राजधानी काबुलपासून सव्वाशे किलोमीटर्सवर असलेला पंजशिर प्रांत तालिबानच्या नियंत्रणात नाही. या प्रांतावर कट्टर तालिबानविरोधी संघटना म्हणून ओळख असणाऱ्या ‘नॉर्दर्न अलायन्स’चा ताबा आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी या भागात आश्रय घेतला असून अश्रफ गनी यांच्या अनुपस्थितीत आपणच राष्ट्राध्यक्ष असल्याची घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानमधील काही माजी मंत्री व नेते तसेच काही लष्करी तुकड्याही पंजशिरमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या तुकड्या दाखल होत असतानाच ‘नॉर्दर्न अलायन्स’चे संस्थापक अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबानला असणारा आपला विरोध व संघर्ष कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. आपल्या वडिलांकडून तालिबानविरोधात संघर्ष करण्याचा वारसा मिळाला असून तो आपण सोडणार नाही, असे अहमद मसूद याने स्पष्ट केले होते. ‘नॉर्दर्न अलायन्स’च्या नेतृत्त्वाखाली विरोधक एकत्र येत असल्याचे पाहून तालिबानने सुरुवातीला चर्चेचा मार्ग अवलंबण्याचे संकेत दिले आहेत.

अफगाणिस्तानमधील रशियाचे दूत दिमित्रि झिरनोव्ह यांनी ही माहिती दिली. तालिबानच्या प्रतिनिधींनी रशियन दूतावासाशी याबाबत संपर्क साधल्याचे झिरनोव्ह यांनी सांगितले. तालिबानने नवा संघर्ष नको असल्याचा दावा केल्याचे रशियन राजदूतांनी म्हंटले आहे. मात्र रशियाच्या माध्यमातून चर्चेचा प्रस्ताव येण्यापूर्वीच पंजशिरमध्ये अहमद मसूद याने संघर्षाची घोषणा केल्याने पुढील काळात या भागात नव्या रक्तपाताला सुरुवात होईल, असे संकेत मिळत आहेत.

‘नॉर्दर्न अलायन्स’च्या नेतृत्त्वाखालील गटांनी बागलान प्रांतातील काही भाग ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी तालिबानने कुंडुझ प्रांतातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी पंजशिरच्या दिशेने रवाना केल्याचे वृत्तही समोर येत आहे. तालिबानच्या तुकड्या अंदरब भागात दाखल झाल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

leave a reply