वायुसेनेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

- वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया

नवी दिल्ली – वायुसेनेने आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि ५जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केले आहे. वायुसेनेच्या कमांडर्स कॉन्फरन्सला संबोधित करताना वायुसेनेप्रमुखांनी हे आवाहन केले. ‘रिओरिएटींग फॉर द फ्युचर’ अशी संकल्पना असलेल्या या वायुसेनेच्या कमांडर्स कॉन्फरन्समध्ये भविष्यातील धोके व आव्हानांचा विचार करून आवश्यक तो आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, वायुसेनाप्रमुखांनी केलेले आवाहन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

पुढच्या आठवड्यात वायुसेनाप्रमुख भदौरिया फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर चालले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान फ्रान्सकडून आणखी सहा रफायल विमाने भारताला पुरविली जातील. यामुळे भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य अधिकच वाढणार असून ही रफायलची नवी तुकडी पश्‍चिम बंगालमधील हाशिमारा येथील तळावर तैनात केली जाईल. याच्या बरोबरीने भारतीय वायुसेनाप्रमुख फ्रान्सच्या हवाई दलाच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील सहकार्य व समन्वय वाढविण्यासाठी ही चर्चा अतिशय उपयुक्त ठरेल, असे दावे केले जातात.

याच्या बरोबरीने वायुसेनाप्रमुख भदौरिया फ्रान्सच्या पॅरिसमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्पेस कमांडला भेट देणार आहेत. याच्या आधी वायुसेनेच्या कमांडर्स कॉन्फरन्सला संबोधित करताना वायुसेनाप्रमुखांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स व ५जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचे आवाहन वायुसेनेला केले आहे. तसेच मोहीम फत्ते करून दाखविण्याची क्षमता अधिक प्रमाणात विकसित करण्याची तयारी वायुसेनेने करावी, असे वायुसेनाप्रमुख यावेळी म्हणाले. यासाठी आपल्याकडील स्त्रोतांचा जास्तित जास्त वापर करण्यावर वायुसेनेेने भर द्यावा, असा संदेश वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी दिला.

वायुसेनेच्या कमांडर्स कॉन्फरन्सला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी संबोधित केले. या कॉन्फरन्समध्ये भविष्यातील आव्हानांचा वेध घेऊन त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेला आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली.

leave a reply