इराक-सिरिया सीमेजवळ इराणसंलग्न दहशतवाद्यांवर हवाई हल्ले

हवाई हल्लेसना/बगदाद – इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ या दहशतवादी संघटनेच्या तीन वाहनांवर मंगळवारी रात्री भीषण हवाई हल्ले झाले. इराक आणि सिरियाच्या सीमेजवळ झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन वाहने भस्मसात झाली. या हवाई हल्ल्यांसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप इराणची सरकारी वृत्तवाहिनी करीत आहे. तर याआधी अशाप्रकारे सिरियातील इराणसंलग्न गटांवर कारवाई करणार्‍या इस्रायलकडेही यासाठी संशयाने पाहिले जात आहे.

‘हश्द अल-शाबी’ किंवा ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस-पीएमयु’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या इराकमधील दहशतवादी संघटनेच्या तीन ट्रक्सवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हवाई हल्ले झाले. या वाहनांमधून दहशतवादी इंफ्रारेड मॉनिटरींग साहित्य नेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. तीनही ट्रक्स इराक सीमा ओलांडून सिरियातील ‘देर अल-झोर’ प्रांताच्या अल-बुकमल शहरात दाखल होताच त्यांच्यावर हवाई हल्ले झाले.

या हल्ल्यांमध्ये दोन ट्रक्स आगीत भस्मसात झाल्याचे व्हिडिओ माध्यमांमधून समोर येत आहेत. या हल्ल्यात जीवितहानी झाली का, हे इराक, सिरिया किंवा इराणच्या अधिकार्‍यांनी दिलेली नाही. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल-मयादीन या लेबेनीज वृत्तसंस्थेने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे. पण हवाई हल्ल्यात झालेल्या नुकसानाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज् समोर आल्यानंतर जीवितहानी झाल्याचा दावा केला जातो.

हवाई हल्लेपरदेशी लढाऊ विमानाने हे हल्ले चढविल्याचा दावा इराणी व सिरियन माध्यमे करीत आहेत. अमेरिकेच्या ‘एफ-१५’ विमानांनी ही कारवाई केल्याचा आरोप इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. तर इराकच्या अन्बर प्रांतातून उड्डाण केलेल्या विमानाने या वाहनांवर चार क्षेपणास्त्रे डागल्याचे सिरियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. याशिवाय इराकमधील हवाईतळ किंवा पर्शियन आखातात तैनात आपल्या विमानवाहू युद्धनौकेवरील अमेरिकेच्या विमानांनी ही कारवाई केल्याची शक्यताही वर्तविली जाते. पण इराक-सिरियाच्या सीमेजवळ झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी अमेरिकेने धुडकावली.

तर याआधी सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर हवाई हल्ले चढविणार्‍या इस्रायलकडेही संशयाने पाहिले जाते. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या पूर्व व पश्‍चिम सीमेपर्यंत हवाई हल्ले चढविले होते. पण इस्रायलच्या लष्कराने आत्तापर्यंत सिरियातील हवाई हल्ल्यांबाबत माध्यमांनी केलेल्या आरोपांना महत्त्व दिलेले नाही.

leave a reply