सिरियातील इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ला

- सिरियन माध्यमांचा इस्रायलवर संशय

लष्करी तळावरदमास्कस – सिरियाच्या पूर्वेकडील अल-बुकमल भागात ड्रोनने चढविलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले झाल्याचा दावा मानवाधिकार संघटना करीत आहेत. नेहमीप्रमाणे सिरियन माध्यमांनी या हल्ल्यासाठी इस्रायलवर थेट आरोप करण्याचे टाळले. पण इराणच्या लष्करी तळावरील या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा संशय सिरियन माध्यमे व्यक्त करीत आहेत.

इराकच्या सीमेजवळ असलेल्या सिरियाच्या देर अल-झोर प्रांतातील अल-बुकमल भागात काही दिवसांपूर्वी मोठा हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात इराणच्या लष्करी तळाचे जबर नुकसान झाल्याचा दावा केला जातो. इराण व इराणसंलग्न दहशतवादी गट वापरत असलेल्या या तळावर शस्त्रास्त्रांचा साठा केला होता. सिरियन लष्कर किंवा माध्यमांनी या स्फोटातील जीवितहानीची माहिती दिली नाही.

पण या हल्ल्यात सदर तळावर उपस्थित सिरियन जवान जखमी झाल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने केला. याआधी इस्रायल तसेच अमेरिकेने येथील इराणच्या हवाईतळावर हल्ले चढविल्याचे समोर आले होते. पण सिरियन माध्यमे व लष्कराने नेहमीप्रमाणे या हल्ल्यासाठी थेट इस्रायलवर आरोप करण्याचे टाळले. अनोळखी ड्रोनने हा हल्ला चढविल्याचे सिरियन माध्यमे सांगत आहेत.

लष्करी तळावरसिरियातील आपल्या लष्करी ठिकाणांवर वाढलेल्या हल्ल्यांमुळे इराण चिंतित असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांपासून आपला शस्त्रसाठा सुरक्षित करण्यासाठी इराणने नव्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिरियातील रशियाच्या लष्करी तळाजवळ इराण आपला शस्त्रसाठा हलवित असल्याची बातमी इस्रायली वृत्तसंस्थेने दिली. इस्रायल आणि रशियामध्ये मैत्रीपूर्ण सहकार्य आहे.

काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट रशियाच्या दौर्‍यावर असताना, राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सिरियातील इस्रायलविरोधी ठिकाणांवर हल्ले चढविण्याला विरोध नसल्याचे आश्‍वासन दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलची विमाने सिरियातील रशियाच्या तळांजवळ कारवाई करणार नाही, असा समज इराणने करुन घेतला आहे. म्हणूनच इराणने सिरियातील आपल्या शस्त्रसाठ्याची हालचाल सुरू केल्याचा दावा इस्रायली वृत्तसंस्था करीत आहे.

दरम्यान, सिरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जावेद घफारी यांच्यावर राष्ट्राध्यक्ष अस्साद नाराज असल्याची बातमी समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या मागणीवरुन इराणने घफारी यांना सिरियातून काढून घेतल्याचे सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिरियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची भेट घेतली होती.

leave a reply