निर्यातीतील वाढ अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत देणारी – वाणिज्यमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात देशाच्या निर्यातीच्या टक्केवारीत झालेली दोन अंकी वाढ अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने रुळावर येत असल्याचा पुरावा आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. १४ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातून ६.८८ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. गेल्या वर्षी याच काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात १०.७३ टक्के अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पियुष गोयल

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) वतीने आयोजित भारत ब्रिटन वार्षिक परिषदेत गोयल बोलत होते. सेवा क्षेत्रात सुमारे ५०० अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली. तसेच भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे पंतप्रधान मोदी यांनी ठेवलेले लक्ष भारत साध्य करेल याबाबत आपण निश्चिंत आहोत, असे गोयल म्हणाले.

भारत आणि ब्रिटनमध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी योग्य वेळ असल्याचेही वाणिज्यमंत्री गोयल यांनी अधोरेखित केले. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. त्याआधी प्रिफेशनल व्यापार करार करून भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याकडे प्राधान्य द्यायला हवे, असे गोयल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्यमंत्री गोयल यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार लवकरच ‘स्ट्रॅटेजी पेपर’ आणणार असल्याचे म्हटले आहे. जुनाट कामगार कायदा चार भागात विभागून सरकारने आधीच या कायद्याला तर्कसंगत केले आहे आणि या संदर्भात आधिसुचना काढली आहे. याच्या पुढील पाऊल स्ट्रॅटेजी पेपर असून स्ट्रॅटेजी पेपर सर्व उद्योगांसाठी एक रूपरेषा असेल, असे गोयल म्हणाले.

त्याचवेळी देशातील उद्योजकांची संघटना असलेल्या ‘फिक्की’च्या कार्यक्रमात बोलताना रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाची अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खाजगी क्षेत्राने पुढे होऊन आपले योगदान वाढवावे, असे आवाहन गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले. अर्थव्यवस्थेसाठी जी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे ती उचलण्या करीता आरबीआय पूर्णपणे तयार असल्याचे दास म्हणाले.

leave a reply