अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी 12 अब्ज डॉलर्सचे सशर्त सहाय्य जाहीर

जीनिव्हा – जीनिव्हा येथे अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित बैठकीत अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधा आणि इतर प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून 12 अब्ज डॉलर्सचे सहाय्य घोषित करण्यात आले. मात्र यासाठी अफगाणिस्तानला काही शर्तींचे पालन करावे लागेल, असे सहाय्याची घोषणा करणाऱ्या देशांनी बजावले आहे.

पुनर्बांधणी

कतारमध्ये अफगाण सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये शांतीचर्चा सुरू आहे. अफगाण सरकारने या शांतीचर्चेबाबत आशावादी असल्याचे म्हटले आहे. या शांतीचर्चेमुळे अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ले कमी होतील, असा दावा अफगाणी सरकार करीत आहे. अशावेळी जीनिव्हातील बैठकीत भारतासह जगभरातील प्रमुख देश व आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाणिस्तानसाठी सुमारे 12 अब्ज डॉलर्सचे सहाय्य जाहीर केले. 2016 सालच्या तुलनेत अफगाणिस्तानला मिळालेल्या आर्थिक सहाय्यात घट झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, जीनिव्हा येथील बैठकीत अफगाणिस्तानसाठी जाहीर करण्यात आलेल्या या अर्थसहाय्याचे महत्त्व वाढले आहे. अमेरिकेने 60 कोटी डॉलर्स, जर्मनीने 51 कोटी डॉलर्स, 23 कोटी डॉलर्स, कॅनडाने 20 कोटी डॉलर्स, फ्रान्सने 10 कोटी तर भारताने आठ कोटी डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली.

यापैकी बहुतांश देशांनी अफगाणिस्तानला सशर्त सहाय्य पुरविण्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानात मानवाधिकारांचा आदर आणि तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेतील प्रगती याचा आढवा घेऊन हे अर्थसहाय्य पुरविले जाईल, असे काही देशांनी बजावले आहे. तर भारताने जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यासाठी अफगाणिस्तानच्या सरकारने आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, कतारमध्ये ही चर्चा सुरू असताना, अफगाणिस्तानच्या बामियान शहरात मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला. या हल्ल्यासाठी ‘आयएस’ जबाबदार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply