इराण-पाकिस्तानची सहकार्य दृढ करण्याची घोषणा

इस्लामाबाद/तेहरान – इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी नुकताच पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानशी व्यापक संबंध विकसित करण्यासाठी इराण उत्सुक असल्याचे परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी या भेटीत स्पष्ट केले. आपल्या दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्‍यात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आधी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा आणि त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. पाकिस्तानने आत्ता सौदी अरेबियाच्या गटातून बाहेर पडून इराण, तुर्कीच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या पाकिस्तान दौर्‍यातून मिळत आहेत.

इराण-पाकिस्तान

इराणचे परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी दोन दिवसांपूर्वी मोठ्या शिष्टमंडळासह पाकिस्तानचा दौरा केला. झरीफ यांनी पाकिस्तानचे आधी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा, त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची भेट घेतली. या दौर्‍यात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचे सरकार तसेच लष्करी अधिकार्‍यांची द्विपक्षीय व्यापार व लष्करी सहकार्यावर चर्चा केली. गेल्या काही वर्षांपासून इराण व पाकिस्तानातील सहकार्य पिछाडीवर गेले होते. पण यापुढे उभय देशांमधील सहकार्याचा वेग वाढवून ते व्यापक करण्याचे दोन्ही देशांच्या नेत्यांनी मान्य केले.

या नव्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर इराण-पाकिस्तान पाईपलाईन पुन्हा सुरू होणार असल्याचे बोलले जाते. इराणने या प्रकल्पाचे काम पूर्ण केले होते. पण पाकिस्तानने अमेरिकन निर्बंधांच्या भीतीमुले पाकिस्तानने हा प्रकल्प रोखला होता. मात्र आता अमेरिकेच्या धमकीची पर्वा न करता पाकिस्तान इराणबरोबरचे हे सहकार्य देखील विस्तारीत करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर देखील उभय देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली.

झरीफ यांची गेल्या सहा महिन्यांमधील पाकिस्तानला ही दुसरी भेट होती. याआधीच्या पाकिस्तान भेटीत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा राजनैतिक स्तरावर मर्यादित होता. पण या भेटीत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भेट घेऊन चर्चा केल्याचे पाकिस्तानी वर्तमानपत्रे लक्षात आणून देत आहेत. या क्षेत्रातील वेगाने बदलणार्‍या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झरीफ यांच्या या भेटीचे महत्त्व वाढल्याचे पाकिस्तानी वर्तमानपत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेत सत्ताबदल होत असून इराणविरोधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जागा आता जो बिडेन घेणार आहेत. त्यामुळे अमेरिकेचे इराणबाबतचे धोरण उदार असेल, हे लक्षात घेऊन पाकिस्तानने इराणशी हातमिळवणी सुरू केली आहे. मात्र, यावर सौदी अरेबिया व सौदीच्या प्रभावाखाली असलेल्या आखाताती इतर देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे.

सौदीने पाकिस्तानला दिलेले दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करण्याची मागणी केली आहे. तर पाकिस्तानची माध्यमे सौदीला लष्करी सहकार्य रोखण्याच्या धमक्या देत आहेत. आजवर सौदीच्या सांगण्यावरुन पाकिस्तानने इराणबरोबरील सहकार्य रोखले होते. मात्र सौदीने याची कधीही जाणीव ठेवली नाही, याची तक्रार काही पाकिस्तानी पत्रकार व विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी सौदीची नाराजी झेलण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाही, याची परखड जाणीव काही जण इम्रान खान यांच्या सरकारला करुन देत आहेत. मात्र पाकिस्तानच्या सरकारने सौदीच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या पाकिस्तान भेटीतून मिळत आहेत.

leave a reply