पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सरकारविरोधी निदर्शनाचा भडका

कराची – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दोन बेटे ताब्यात घेण्यासंबंधी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात निदर्शनाचा भडका उडाला. गेल्या दोन दिवसांपासून सिंध प्रांताची राजधानी कराचीमध्ये सरकारच्या या निर्णयाविरोधात हजारो जणांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामागे चीन असल्याचा आरोप सुरू झाला असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिंधच्या जनतेच्या या निदर्शनांना स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या गटांनीही समर्थन दिले आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सरकारविरोधी निदर्शनाचा भडकाया महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सरकारने सिंध प्रांतातील डिंगी आणि भूंदर या दोन बेटांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. इम्रान सरकारने ही दोन्ही बेटे सिंध प्रांतापासून तोडून त्यांचा ताबा घेत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. डिंगी आणि भूंदर या बेटांच्या विकासासाठी ही कारवाई केली जात असल्याचा खुलासा पाकिस्तानच्या सरकारने केला. पण पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर सिंध प्रांतात वर्चस्व असणार्‍या ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’ (पीपीपी) तसेच ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ (एमक्यूएम) आणि ‘सिंध तरक्की पसंद पार्टी’ (एसटीपीपी) या पक्षांनी टीका केली होती. कुठल्याही आधार नसलेल्या गोष्टींचा वापर करुन पाकिस्तानचे सरकार सिंधच्या जनतेला वारंवार पिळवणूक असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.

रविवारपासून ‘एसटीपीपी’ या पक्षाने सिंध प्रांतात सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने सुरू केली. कराचीच्या मालीर भागापासून ते गव्हर्नर हाऊसपर्यंत आयोजित केलेल्या या निदर्शनात हजारोंच्या संख्येने सिंधची जनता सहभागी झाली होती. या निदर्शनांमध्ये सिंध प्रांतातील राजकीय नेत्यांपासून साहित्यिक, लेखक, कवींपासून सामान्य जनता सहभागी झाली होती. सिंधच्या जनतेला हद्दपार करणारे इम्रान सरकारचे नियम मान्य केले जाणार नाहीत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. डिंगी आणि भूंदर बेटांच्या विकासाच्या आड सरकार या बेटांना नष्ट करण्याचा डाव आखत असून किमान आठ लाख स्थानिक यामुळे बेघर होतील, अशी टीका यावेळी करण्यात आली.

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामागे चीन असल्याचा गंभीर आरोप सुरू झाला आहे. सिंधच्या बेटांचा ताबा घेण्यासाठी चीनने हा कट आखल्याचा दावा स्थानिक राजकीय पक्ष करीत आहेत. या बेटांच्या विकासाच्या आड चीन हळुहळू या बेटांचा ताबा घेईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात पंतप्रधान इम्रान यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये मोठ्या निदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तानातील सरकारविरोधी गटांनी या निदर्शनांचे आवाहन केले आहे. या निदर्शनांमध्ये सिंधी, बलूच, पश्तू जनता सहभागी होणार असून पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेलाही या निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

leave a reply