’कोव्हॅक्सिन’ चे उत्पादन वाढविण्यासाठी हाफकिनसह तीन संस्थांना मंजुरी

नवी दिल्ली/मुंबई – हाफकिन इंन्स्टिट्यूट देशातील तीन संस्थांना ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. देशात कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाला वेग देण्याकरिता कोरोनावरील लसींच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची आवश्यकता आहे. देेशात सध्या ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’ने (आयसीएमआर) विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. तर नुकतेच केंद्र सरकारने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीलाही वापरासाठी मंजुरी दिली आहे. मात्र या लसीला अद्याप लसीकरण कार्यक्रमात सामावून घेण्यात आलेले नाही.

देेशात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला असून गुरुवारपासून शुक्रवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात सुमारे दोन लाख १७ हजार नवे रुग्ण आढळले, तर हजारपेक्षा बळी गेला. देशातील दहा राज्ये कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात दरदिवशी ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळत असून उत्तर प्रदेशात २० ते २२ हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोेंद होत आहे. छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा राज्यांमध्ये समावेश आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात दिवसभरात ३९८ जणांचा या साथीने बळी गेला आहे. तसेच सुमारे ६४ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. हा नवा उच्चांक आहे. देशात कोरोनाची साथ थोपविण्यासाठी नियमांचे पालन, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीबरोबर लसीकरण व्यापक करण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे वेगाने लसीकरण पुर्ण होणे आवश्यक आहे. मात्र लसीच्या उत्पादन आणि लसीच्या मागणी यामध्ये समतोल बसत नसल्याचे आक्षेप होते. काही राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याची तयारी दाखविली. मात्र त्या तुलनेत लसीचा पुरवठा व्हायला हवा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात आलेल्या काही सूचनांच्या आधारावर ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन घेण्याची परवानगी आणखी तीन संस्थांना देण्यात आली आहे.

‘कोव्हॅक्सिन’ ही भारतीय कंपनीने विकसित केली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे ही बाब शक्य झाली आहे. आता ‘हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘इंडिनय इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ आणि ‘भारत इम्युनोलॉजिकल्स व बायोलॉजिक्स लिमिटेड’ या संस्थांना ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन घेता येणार आहे. सध्या भारत बायोटेकच्या प्रकल्पात महिन्याला १ कोटी पर्यंत लसींचे उत्पादन घेण्यात येते. मात्र या तीन संस्थांनाही ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन घेण्याची परवानगी मिळाल्यावर जुलैपर्यंत महिन्याला ६ ते ७ कोटी लसींचे उत्पादन शक्य होईल. तसेच सप्टेंबरपर्यंत ही क्षमता १० कोटीपर्यंत जाईल.

दरम्यान, ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ ही ब्रिटीश कंपनी असल्याने ‘कोविशिल्ड’च्या बाबतीत सध्यातरी इतर ठिकाणी उत्पादन शक्य दिसत नाही. सिरम इन्स्टिट्यूटकडून ‘कोविशिल्ड’चे उत्पादन भारतात घेतले जात आहे. मात्र यावर सध्या काही मर्यादा आल्याचे वृत्त आहे. या लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेतूनही आयात केला जातो. मात्र अमेरिकेने यातील काही मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी हटवावी, असे आवाहन सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक अदार पुनावाला यांनी अमेरिकेला केले आहे.

leave a reply