चीन व रशियाकडून कोरोना लसीकरण मोहीम उधळण्याचे प्रयत्न

- अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – चीन व रशिया हे शत्रूदेश अमेरिकेतील कोरोना लसीकरणाची मोहीम उधळण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विल्यम एव्हॅनिना यांनी दिला. गेल्या महिन्यात अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने यासंदर्भात गंभीर इशारा दिला होता. त्यापूर्वी अमेरिका तसेच ब्रिटनने, रशिया व चीनमधील हॅकर्स कोरोना लसीसंदर्भातील संशोधन चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला होता.

अमेरिकेसह ब्रिटन व युरोपिय देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू झाली आहे. अमेरिकेतील मोहिमेला ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ असे नाव देण्यात आले असून, आतापर्यंत ९० लाख अमेरिकी नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. या लसीकरणासाठी अमेरिकेने ‘फायझर’ व ‘मॉडर्ना’ या दोन कंपन्यांबरोबर करार केले आहेत. लसीकरण मोहिमेसाठी अमेरिकेचा आरोग्य विभाग लष्कर व गुप्तचर यंत्रणांबरोबर काम करीत आहे.

यासंदर्भातील माहितीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात, ‘युएस नॅशनल काऊंटरइंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी सेंटर’चे प्रमुख विल्यम एव्हॅनिना यांनी लसीकरण मोहिमेतील अडथळ्यांबाबत इशारा दिला. ‘ही अतिशय गुंतागुंतीची समस्या आहे. अमेरिकेतील प्रशासकीय यंत्रणा व लष्कर ऑपरेशन वार्प स्पीड यशस्वी करण्यासाठी धडपडत आहेत. लस सुरक्षितरित्या सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये काही शत्रूदेश अडथळे आणत आहेत. लसीकरणासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी उधळण्याची योजना आखण्यात आली आहे. या शत्रूदेशांमध्ये चीन व रशियाचा समावेश आहे’, असा इशारा एव्हॅनिना यांनी दिला.

अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांपूर्वी ‘एफबीआय’ तसेच ‘आयबीएम’ या बहुराष्ट्रीय कंपनीनेही लसीकरण मोहिमेचा भाग असणार्‍या ‘सप्लाय चेन’ला लक्ष्य केले जाईल, असे बजावले होते. एफबीआयच्या वरिष्ठ अधिकारी ‘टोन्या उगोरेट्झ’ यांनीही शत्रूदेशांबाबत बजावले होते. कोरोना लसीचे उत्पादन व वितरण या क्षेत्राशी जोडलेल्या कंपन्या तसेच गटांमध्ये घुसण्याचे प्रयत्न होतील, असे उगोरेट्झ यांनी म्हटले होते. त्याचवेळी सायबरहल्ल्याचीही शक्यता एफबीआयकडून व्यक्त करण्यात आली होती.

अमेरिकेतील ‘सायबरसिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’ तसेच ‘आयबीएम’ या कंपनीने कोरोना लसीच्या पुरवठा साखळीवर सायबरहल्ले चढविले जातील, असा अ‍ॅलर्ट जारी केला होता. लसी साठविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जागा (स्टोरेज) तसेच वाहतूक करणार्‍या कंपन्या यांना सायबरहल्ल्यांचे लक्ष्य केले जाईल, असे अ‍ॅलर्टमध्ये बजावले होते.

अमेरिकेत सध्या लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू असली तरी त्याचा वेग कमी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अमेरिकेतील विविध राज्यांकडून अपेक्षित निकष पाळले जात नसल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘सप्लाय चेन’ लक्ष्य करण्याबाबत देण्यात आलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाच्या साथीत २४ तासात सुमारे साडेचार हजार जण दगावले असून बळींची संख्या तीन लाख ८१ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मंगळवारी कोरोनाचे दोन लाख ३० हजार रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. नव्या वर्षात पहिल्या १२ दिवसातच अमेरिकेत ३४,५०२ जणांचा बळी गेल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

leave a reply