यापुढे 14 ऑगस्ट हा फाळणी वेदना स्मृतीदिन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली – “देशाच्या फाळणीने दिलेल्या वेदना कधीही विसरता येणार नाहीत. द्वेष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो बंधुभगिनी विस्तापित झाले आणि आपला जीव गमवावा लागला. त्या साऱ्यांच्या संघर्षाचे स्मरण ठेवण्यासाठी यापुढे 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून पाळला जाईल. हा दिवस आपल्याला वैमनस्य आणि शत्रूत्त्वाचे जहर संपविण्यासाठी प्रेरित करण्याबरोबरच आपला एकोपा व सामाजिक सद्भाव वाढवून मानवी संवेदना अधिक दृढ करील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

यापुढे 14 ऑगस्ट हाफाळणी वेदना स्मृतीदिन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणाभारताच्या स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत असतानाच, पंतप्रधानांनी 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ घोषित करून फार मोठा निर्णय घेतला आहे. विद्वेषी राजकारण व हिंसाचाराचा आधार घेऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. मात्र पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारतासाठी फाळणीच्या भयंकर हिंसाचाराच्या स्मृतींचा भाग ठरतो. हा इतिहास नाकारता येणार नाही व भारताच्या द्वेषावरच पाकिस्तानची उभारणी झालेली आहे, याचाही विसर पडू देता येणार नाही, असा संदेश पंतप्रधानांनी या घोषणेद्वारे दिलेला आहे. अर्थातच यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आली.

भारताच्या पंतप्रधानांनी केलेली ही घोषणा म्हणजे इतिहासाचा विपर्यास ठरतो, अशी टीका पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेली आहे. तसेच आधुनिक राष्ट्राकडून अशा स्वरुपाची अपेक्षा नसते, असे सांगून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झईद हफीज चौधरी यांनी आपल्या देशाची नाराजी व्यक्त केली. तसेच हा राजकीय स्टंट असल्याचा दावा करून भारत जूने घाव भरून काढण्याच्या ऐवजी त्यावर मीठ चोळत असल्याची टीका देखील चौधरी यांनी केली आहे. तसेच गेल्या महिन्यात लाहोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचे सबळ पुरावे पाकिस्तानने जगजाहीर केले आहेत, त्याकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भारत अशा कारवाया करीत असल्याचा हास्यास्पद आरोप चौधरी यांनी केला.

याबरोबरच भारताने दहशतवादाचा मार्ग सोडून द्यावा, अशी मागणी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केली. असे बेताल आरोप करीत असला, तरी पंतप्रधान मोदी यांच्या या घोषणेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मोहम्मद अली जिना यांनी चिथावणी दिल्यानंतर पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचार सुरू झाला होता. हे सत्य दडपण्याचा प्रयत्न आजवर पाकिस्तानने केला होता. त्यामुळे या देशाची निर्मिती सनदशीर मार्गाने नाही, तर विद्वेष आणि हिंसेच्या आधारानेच झाली होती, ही बाब यामुळे दरवर्षी जगासमोर येत राहिले. म्हणूनच सोशल मीडियावर भारतीयांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचे स्वागत केले.

फाळणीचा इतिहास नाकारता येऊच शकणार नाही. उलट या इतिहासातून आपल्याला धडा घेता येईल. म्हणूनच ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ अतिशय महत्त्वाचा ठरतो, असे दावे करण्यात येत आहेत. काही वृत्तवाहिन्यांवर विश्‍लेषकांनी या निमित्ताने फाळणीत आपले सर्वस्व गमावणाऱ्यांच्या मुलाखती सादर करण्याचा सल्ला दिला. यामुळे नव्या पिढीला फाळणीचा खरा इतिहास कळेल, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply