ऑस्ट्रेलिया चीनच्या दबावासमोर झुकणार नाही

- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाला आर्थिक परिणामांची धमकी देणाऱ्या चीनला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘चीनच्या दबावासमोर नमते घेऊन ऑस्ट्रेलिया अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि सुरक्षेशी अजिबात तडजोड करणार नाही. ऑस्ट्रेलिया कायम ऑस्ट्रेलियाच राहिल’, असे पंतप्रधान मॉरिसन यांनी ठणकावले. आपल्या सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेत कुठलाही बदल होणार नसल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी स्पष्ट केले.

चीनच्या दबावासमोर

गेल्या आठवड्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलियावर गंभीर आरोप केले होते. ऑस्ट्रेलियाने आपल्या चीनविरोधी भूमिकेतून माघार घेतली नाही तर या देशाला आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल, असे चीनने धमकावले होते. चीनच्या आर्थिक सामर्थ्यासमोर ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था टिकणार नसल्याचा दावा चीनने केला होता. तर ऑस्ट्रेलियाने चीनला शत्रू मानलेच तर चीन ऑस्ट्रेलियाला शत्रूसारखीच वागणूक देईल, अशी धमकी चीनने दिली.

स्कॉट मॉरिसन यांचे सरकार ऑस्ट्रेलिया-चीन संबंधांमध्ये जहर मिसळण्याचे काम करीत असल्याचा आरोप चीनने केला होता. ऑस्ट्रेलियाने हुवेई या चिनी कंपनीवर घातलेली बंदी, तैवान, हाँगकाँग व झिंजियांगमधील चीनच्या कारवाईवर केलेली जोरदार टीका, चीनच्या ऑस्ट्रेलियामधील गुंतवणुकीला केलेला विरोध, यावर चीन संतापलेला आहे. कोरोनाव्हायरसच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करून ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी चीनला अधिकच नाराज केले होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासारख्या देशात आपल्या हस्तकांमार्फत राजकीय हस्तक्षेप करण्याचा कुटील डाव उधळण्यासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हाती घेतलेल्या ठाम उपाययोजना चीनला अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळेच चीनने ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांची धमकी दिली होती.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी चीनच्या या धमकीला प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियाने कधीही आपल्या राष्ट्रीय हितांशी व कायद्याशी तडजोड केली नाही किंवा हे कायदे इतर देशांच्या हाती जाऊ दिले नाही. आत्ताही चीनच्या धमकीसमोर झुकून ऑस्ट्रेलिया आपल्या भूमिकेतून माघार घेणार नसल्याचे मॉरिसन यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सुरक्षा आणि मानवाधिकारांबाबत मांडलेली भूमिका यापुढेही कायम राहणार असल्याचे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले.

दरम्यान, काही तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या ‘फाईव्ह आईज’ने हाँगकाँगच्या मुद्यावरुन चीनला फटकारले होते. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने त्यांच्याविरोधात उठणारा प्रत्येक आवाज संपविण्यासाठी पद्धतशीर मोहीम सुरू केल्याचा आरोप ‘फाईव्ह आईज’ने केला होता. तसेच चीनला रोखण्यासाठी जपानबरोबर व्यापक संरक्षण सहकार्य करार करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाने केली होती.

leave a reply