1964 ते 1996 या काळात चीनच्या अणुचाचण्यांमुळे जवळपास दोन लाख जणांचा बळी घेतला

- अमेरिकेच्या नियतकालिकाची माहिती

1964 ते 1996वॉशिंग्टन – 1964 ते 1996 या काळात झिंजियांग प्रांतातील चीनच्या अणुचाचण्यांमुळे झालेल्या किरणोत्सर्गाने एक लाख 94 हजार जणांचा बळी गेला. इतकेच नाही तर सुमारे 12 लाख जणांना कॅन्सर आणि महिलांना गर्भाशयाबाबतचे घातक आजार जडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महिन्याभरापूर्वी चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. चिनी यंत्रणांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फ्रेंच कंपनीने याबाबत दिलेल्या माहितीनंतर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे लपवाछपवी जगासमोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या अणुप्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला आहे.

1964 ते 1996चीनने झिंजियांग प्रांतातील लोप नूरच्या वाळवंटात 16 ऑक्टोबर 1964 रोजी पहिली अणुचाचणी घेतली होती. त्यानंतर चीनने 1996 सालापर्यंत लोप नूरमध्येच सलग 45 अणुचाचण्या घेतल्या. यापैकी 23 चाचण्या या वातावरणात तर उर्वरित अंडरग्राऊंड करण्यात आल्याची माहिती अमेरिकेतील आघाडीच्या नियतकालिकाने प्रसिद्ध केली. याच काळात चीनने थर्मोन्यूक्लिअर चाचणीही केली होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत 200 पट अधिक क्षमतेची ही आण्विक चाचणी होती.

यापैकी काही चाचण्या या अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकाचे उल्लंघन करणाऱ्या होत्या, असा आरोप अमेरिकेने गेल्या वर्षी केला होता. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण 32 वर्षांच्या कालावधीत चीनच्या या अणुचाचण्यांमधून झालेल्या तीव्र किरणोत्सर्गाने एक लाख 94 हजार जणांचा बळी गेल्याची माहिती अमेरिकी नियतकालिकाने दिली. 1986 साली चेर्नोबिल अणुप्रकल्पात झालेल्या किरणोत्सर्गापेक्षाही झिंजियांगमधील अणुचाचण्यांतून 1964 ते 1996झालेला किरणोत्सर्ग मोठा होता, असा दावा जपानच्या एका अभ्यासकाने केला आहे. या किरणोत्सर्गाने झिंजियांग प्रांतातील सुमारे 12 लाख जणांना ल्युकेमिया, कॅन्सर आणि महिलांना गर्भाशयाबाबतचे घातक आजार जडले. कधीकाळी खाऱ्या पाण्याचा तलाव असलेला लोप नूर भाग आता शुष्क बनल्याचे अमेरिकी नियतकालिकाने लक्षात आणून दिले. यानंतरच्या काळात चीनने आपल्या अणुचाचण्यांचे केंद्र बदलले. तसेच लोप नूरमधील किरणोत्सर्ग आणि अमेरिकी नियतकालिकातील आरोपांवर बोलण्याचे टाळले आहे. आत्ताही चीन आपल्या अणुकार्यक्रमाबाबत लपवाछपवी करीत असल्याचे उघड होत आहे.

साधारण दीड महिन्यापूर्वी चीनच्या ग्वांगडाँग प्रांतातील ताईशान अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. अणुप्रकल्पातून ‘फ्युजन गॅस’ची गळती हा गंभीर सुरक्षेचा मुद्दा ठरू शकतो, असे इशारे देण्यात आले होते. अमेरिकी माध्यमांनी सदर घटनाक्रम चेर्नोबिलमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रमाणे असल्याचा दावा केला होता. पण चीनच्या यंत्रणांनी सारे काही आलबेल असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

मात्र ताईशान प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या फ्रेंच कंपनीने चीनचे पितळ उघडे पाडले. हा प्रकल्प आपल्या देशात असता, तर तो तातडीने बंद करून टाकला असता, असे या फ्रेंच कंपनीने म्हटले होते. वेगळ्या शब्दात चीन या प्रकल्पाबाबत फार मोठा धोका पत्करत आहे, असे या फ्रेंच कंपनीने बजावले आहे.

 

leave a reply