बायडेन प्रशासनाने दीड लाखांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडले

वॉशिंग्टन – गेल्या सहा महिन्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सुमारे दीड लाखांहून अधिक अवैध निर्वासितांना देशात मोकळे सोडून दिल्याचे उघड झाले आहे. ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात, अमेरिकेतील निर्वासितांची समस्या हाताळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राबविलेली धोरणे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापेक्षा चांगली होती, असा निष्कर्ष समोर आला होता. नवी माहिती त्याला दुजोरा देणारी दिसत आहे.

बायडेन प्रशासनाने दीड लाखांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडलेअमेरिकेच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या ‘बॉर्डर पेट्रोल एजन्सी’ने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमधून अवैध निर्वासितांबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यापासून मेक्सिको सीमेतून येणार्‍या निर्वासितांना अमेरिकेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. त्यासाठी ‘बॉर्डर पेट्रोल एजन्सी’ला देण्यात आलेल्या विविध अधिकारांचा अनियंत्रित वापर करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात फक्त पॅरोलअंतर्गत सोडण्यात येणार्‍या निर्वासितांची संख्या ३१ हजारांहून अधिक आहे. अशा निर्वासितांना अमेरिकेत ‘वर्क परमिट’ची सुविधा मिळत असल्याने ही बाब अधिक धोकादायक असल्याचा इशारा माजी अधिकार्‍यांनी दिला.

‘एनटीआर’ नावाच्या तरतुदीचा वापर करून मार्च ते ऑक्टोबर या काळात ९४ हजारांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत सोडण्यात आले आहे. तर ‘ओआरएस’अंतर्गत गेल्या दोन महिन्यात ३९ हजारांहून अधिक अवैध निर्वासितांना सोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. याव्यतिरिक्तही हजारो निर्वासित यंत्रणांनी सोडल्याचे सांगण्यात येत असून, अशा अवैध निर्वासितांची संख्या जवळपास १लाख, ६० हजारांहून अधिक असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात, अमेरिकेच्या ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाने हैतीतून आलेल्या १२ हजारांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडून दिल्याचे जाहीर केले होते. ही संख्या जास्त असू शकते, असे संकेतही अधिकार्‍यांकडून देण्यात आले होते.

बायडेन प्रशासनाने दीड लाखांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडलेअवैध निर्वासितांच्या सुटकेची माहिती समोर आल्यावर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य टॉम टिफनी यांनी, बायडेन प्रशासनाने अवैध निर्वासितांना अमेरिकेत सोडणारी पाईपलाईन तयार केल्याचा टोला लगावला आहे. ‘टी पार्टी पॅट्रियॉट्स’ या गटाच्या संस्थापक जेनी बेथ मार्टिन यांनीही टीकास्त्र सोडले असून मोकळ्या सोडलेल्या सीमा देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणार्‍या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

मात्र बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच ‘रिमेन इन मेक्सिको’ रद्द करून अवैध निर्वासितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या होत्या.

leave a reply