बायडेन यांनी चीनच्या अमानुषतेवर सांस्कृतिक संवेदनशीलतेचा मुखवटा चढविला

- अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सल्लागार मॅक्मास्टर यांचा घणाघात

वॉशिंग्टन – झिंजियांगमध्ये उघूरवंशियांवर चीनकडून केला जात असलेला अत्याचार म्हणजे चीनच्या संस्कृतीचा भाग ठरतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले होते. बायडेन यांच्या या विधानावर अमेरिकेत जळजळीत टीका होत आहे. उघूरांच्या वंशसंहाराचे समर्थन करुन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या अमानुषतेवर सांस्कृतिक संवेदनशीलतेचा मुखवटा चढवल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनी केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी बायडेन प्रशासनार चीनच्या सूरात सूर मिसळत असल्याचा ठपका ठेवला होता.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे चीनला एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बायडेन यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. यासाठी झिंजियांगमधील उघूर, हाँगकाँगमधील लोकशाहीसमर्थकांवर जिनपिंग यांना कठोर भूमिका घ्यावी लागत असल्याचे सांगून बायडेन यांनी चीनच्या अमानुष कारवायांचे उदात्तीकरण केले होते.

सांस्कृतिकदृष्ट्या चीन स्वतंत्र देश असून चीनच्या अंतर्गत धोरणाबाबत अमेरिका नाक खुपसू शकत नाही, असा सूर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या मुलाखतीत लावला होता. बायडेन यांच्या या मुलाखतीला आठवडा उलटला आहे. तरी देखील उघूरांबाबत केलेल्या विधानावर अमेरिकेतूनच प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेल्या एच. आर. मॅक्मास्टर यांनी बायडेन यांनी उघूरांच्या वंशसंहाराबाबत केलेले विधान सर्वात मोठी चूक असल्याची टीका केली.

अमेरिकेतील लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांचा गट हेतूपुरस्सर चीनधार्जिणा अजेंडा राबवित असल्याचा घणाघाती आरोप मॅक्मास्टर यांनी केला. ‘‘या गटांकडे अमेरिकेतील काही उपयुक्त मुर्ख (युजफूल इडियटस्) आहेत. त्यांच्यामार्फत ‘चीन बिचारा देश आहे’ अशी पोपटपंची सुरू ठेवली जाते’’, असा घणाघाती हल्ला मॅक्मास्टर यांनी चढविला.

मॅक्मास्टर यांच्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाने देखील बायडेन यांच्या चीनबाबतच्या गुळमुळीत धोरणावर कोरडे ओढले व माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनबाबत स्वीकारलेल्या धोरणांची प्रशंसा केली. ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प यांच्या चीनबाबतच्या धोरणांना मिळालेले मोठे यश बायडेन प्रशासन पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा आरोप १५० प्रतिनिधींचा समावेश असलेल्या ‘रिपब्लिकन स्टडी कमिटी’ने केला. तसेच चीनला त्यांच्या चुकीच्या कृत्यासाठी जबाबदार न धरता बायडेन प्रशासन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या चीनधार्जिण्या धोरणाचा अवलंब करीत असल्याचा ठपका या कमिटीने ठेवला.

दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी सोमवारी अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी बायडेन प्रशासनाला सहकार्याचा नवा प्रस्ताव दिला आहे. गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेली चर्चा यादिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल होते, असा दावा यी यांनी केला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात चीनच्या उत्पादनांवर वाढीव कर लादले, काही उत्पादनांवर निर्बंध टाकले होते. आता राष्ट्राध्यक्ष बायडेन चिनी उत्पादनांवरील कराचा बोजा कमी करतील, असा विश्‍वास चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

leave a reply