अमेरिकेतील वाढत्या महागाईला बायडेन यांची धोरणे जबाबदार

- अमेरिकन जनतेचा ठपका

महागाईवॉशिंग्टन – अमेरिकेतील वाढत्या महागाईसाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची धोरणे जबाबदार असल्याचा दावा ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. ‘पॉलिटिको’ने ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या गटाबरोबर केलेल्या सर्वेक्षणात ६२ टक्के मतदारांनी महागाईसाठी बायडेन कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी बायडेन यांच्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने राष्ट्राध्यक्ष बायडेन माध्यमांना वैयक्तिक पातळीवर सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे टीकास्त्रही सोडले आहे. बायडेन यांचे हे धोरण म्हणजे ‘बंकर मेंटॅलिटी’ असल्याचे लेखात बजावण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अमेरिकी जनतेत असणारी नाराजी वाढत असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून समोर येत आहे. अफगाणिस्तानमधील माघार व निर्वासितांच्या मुद्याची हाताळणी यासारखे मुद्दे त्यासाठी प्रमुख कारण ठरले होते. त्यापाठोपाठ आता त्यात महागाईचीही भर पडल्याचे दिसतेे. ‘पॉलिटिको’ ही अमेरिकेतील आघाडीची माध्यम कंपनी असून वेबसाईट, वृत्तपत्रे, रेडिओ तसेच पॉडकास्टस्च्या माध्यमातून बातम्या व इतर माहिती प्रसारित करते. या कंपनीने ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या गटाच्या सहाय्याने बायडेन यांच्या कारभारासंदर्भात नुकतेच सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणानुसार, ६२ टक्के अमेरिकी मतदारांनी अमेरिकेतील वाढत्या महागाईसाठी बायडेन यांची धोरणे जबाबदार असल्याचे नोंदविले आहे. अमेरिकेत सध्या कच्चे तेल व इंधनाचे दर विक्रमी पातळीवर असून ‘सप्लाय चेन क्रायसिस’मुळे इतर उत्पादनांच्या किंमतीही वाढत आहेत. ही वाढती महागाई अमेरिकेतील मंदीचे संकेत असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘पॉलिटिको’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष महत्त्वाचा मानला जातो. सदर सर्वेक्षणात बायडेन यांच्याविरोधातील नाराज मतदारांचे प्रमाणही ५२ टक्क्यांवर गेल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या तीन प्रमुख सर्वेक्षणांमध्येही बायडेन यांच्या कारभाराविरोधात अमेरिकी जनतेत निराशेचे वातावरण असल्याचे उघड झाले होते. ‘गॅलप पोल’च्या सर्वेक्षणात, बायडेन यांच्या कारभाराविरोधात तब्बल ५३ टक्के नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आयोवा प्रांतातील एका सर्वेक्षणात हेच प्रमाण ६० टक्क्यांवर गेल्याचे समोर आले होते. तर ‘रासमुसेन रिपोर्टस्’च्या सर्वेक्षणात, ५१ टक्के नागरिकांनी ट्रम्प यांची धोरणे चांगली होती, असे मत नोंदविले होते.

या सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवरच ‘पॉलिटिको’ने बायडेन यांच्या प्रशासनावरही टीकास्त्र सोडले आहे. गेल्या नऊ महिन्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी वैयक्तिक पातळीवर प्रसारमाध्यमांना फक्त १० मुलाखती दिल्याचे निदर्शनास आणून दिले. अमेरिकेतील आघाडीची दैनिके असलेल्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांना बायडेन यांनी मुलाखती दिलेल्या नाहीत. वृत्तवाहिन्यांमध्येही ‘सीबीएस’, ‘सीएनन’, ‘एमएसएनबीसी’, ‘एबीसी’, ‘ईएसपीएन’, ‘एनबीसी’ व ‘युनिव्हिजन’ वगळता कोणालाही मुलाखती दिलेल्या नाहीत. माध्यमांना थेट मुलाखती नाकारण्याचे हे धोरण म्हणजे ‘बंकर’मध्ये दडून राहण्याची मानसिकता असल्याची टीका ‘पॉलिटिको’च्या लेखात करण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच कालावधीत जवळपास ५७ मुलाखती दिल्या होत्या, याकडेही ‘पॉलिटिको’च्या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

leave a reply