महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव

- दिल्ली आणि उत्तराखंडमध्येही ‘बर्ड फ्ल्यू’ची पुष्टी

नवी दिल्ली/मुंबई – देशात ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव दहा राज्यात झाल्याचे सोमवारी केेद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये सापडलेल्या मृत पक्ष्यांच्या नमून्यांचे अहवाल आले आहेत आणि या राज्यातही पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यू’मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महराष्ट्रातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’ धोकादायक पक्ष्यांकडून मानवाला लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र तसे झाल्यास यासाथीमुळे होणारा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हाय अलर्ट घोषीत करणे गरजेेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव

आतापर्यंत देशातील दहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयातर्फे देण्यात आली. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी सुमारे ९०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबई, ठाणे, परभणी, बीड, रत्नागिरी, अहमदनगर, नांदेड, उस्मानाबादमध्ये देखील बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तर अन्य जिल्ह्यातील पक्ष्यांचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील जवळपास ८० हजार कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले होते. तर मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे मृतावस्थेत आढळले. ठाण्यात कावळे व पोपट मरण पावले आहेत. नांदेडमध्ये देखील १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. रत्नागिरीच्या दापोली येथे कावळे मरून पडल्याचे समोर आले आहे. राज्यातील या सर्व घटना पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

२५ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले होते. येथील पक्ष्यांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले असता. बर्ड फ्ल्यूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर केरळ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये बर्फ फ्ल्यूचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यात कोंबड्यांची कत्तल करण्यात येत असून निर्जंतुकीकरण हाती घेण्यात आले आहे. केंद्राकडून वेगवेगळ्या प्राणी संग्रहालय व्यवस्थापनांना ‘केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणा’कडे दररोज अहवाल पाठण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्य राज्यात होत असलेल्या बर्ड फ्ल्यू फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्यांमधून अंडी आणि कोंबड्यांच्या वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहेत. कोरोनामुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला होता. त्यातच आता ‘बर्ड फ्ल्यू’मुळे देशभरात चिकन आणि अंड्याची मागणी ७० ते ८० टक्क्यांनी घसरली असून किंमती ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत.

leave a reply