पाकिस्तानात ‘जमात’चा प्रमुख हफीज सईदच्या घराजवळ स्फोट

- तीन ठार, 20 जण जखमी

लाहोर – मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व ‘जमात-उद-दवा’चा प्रमुख हफीज सईदच्या घराजवळ बुधवारी झालेल्या स्फोटात तीनजण ठार झाले. यामध्ये हफीजच्या घराजवळ तैनात सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याचा दावा केला जातो. हा कारबॉम्ब स्फोट असल्याची माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली. हफीज सईद हा पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात असल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांचा जीव धोक्यात आल्याचा दावा पाकिस्तानी विश्‍लेषक करीत आहेत. या स्फोटानंतर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयात पंतप्रधान इम्रान खान, लष्करप्रमुख जनरल बाजवा व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची सुरक्षाविषयक बैठक पार पडली.

पाकिस्तानात ‘जमात’चा प्रमुख हफीज सईदच्या घराजवळ स्फोट - तीन ठार, 20 जण जखमीया स्फोटामुळे पाकिस्तानला नको असलेल्या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. येत्या काही दिवसात ‘फायनॅन्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ची विशेष बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाकिस्तानच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. याआधी दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य पुरविल्याच्या आरोपाप्रकरणी ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते. गेल्या दीड वर्षांच्या मुदतीत एफएटीएफने दिलेल्या निकषांचे पालन करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला तर, या देशाला ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, हफीज सईदच्या घराजवळ झालेल्या स्फोटाने पाकिस्तानच्या अडचणी वाढविल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि पाकिस्तान सरकार दावा करीत असल्याप्रमाणे तुरुंगात असलेल्या हफीज सईदच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक कसे काय तैनात असू शकतात? असा प्रश्‍न पाकिस्तानातच विचारला जात आहे. त्याचबरोबर या हल्ल्यानंतर जखमींना भेटण्यासाठी हफीज सईद व त्याचा मुलगा हफीज तल्हा येथील रुग्णालयात गेल्याचे दावेही केले जात असून तसे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तुरुंगात असलेला दहशतवादी रुग्णालयात कसा जाऊ शकतो? असा प्रश्‍नही विचारला जात आहे. पण हे फोटोग्राफ्स खोटे असून हफीज तुरुंगात असल्याचा दावा येथील माध्यमे करीत आहेत.

बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास लाहोरच्या जोहर भागात हा स्फोट झाला. त्यानंतर पाकिस्तानी यंत्रणांनी हा सिलिंडर स्फोट असल्याचे जाहीर करून सदर प्रकरणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिकांनी हा सिलिंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याचे दावे केल्यानंतर, पाकिस्तानी पोलिसांना त्याची कबुली द्यावी लागली होती. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी यंत्रणांचे धाबे दणाणल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा आणि गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ अहमद यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीतील तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. पण या स्फोटामुळे पंतप्रधान इम्रान यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांमधील त्यांचे पाठिराखे विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply