अमेरिकेच्या ‘एक्स-37 स्पेसक्राफ्ट’मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे

- रशियन कंपनीच्या प्रमुखांचा दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ‘एक्स-37 बी’ या अंतराळयानामध्ये सहा अण्वस्त्रे वाहून नेली जाऊ शकतात व 2025 सालापर्यंत अशी आठ अंतराळयाने अवकाशात तैनात करण्याची अमेरिकेची योजना आहे, असा खळबळजनक दावा रशियन संरक्षण कंपनीचे प्रमुख यान नोविकोव्ह यांनी केला. 2006 साली पहिली यशस्वी चाचणी घेतलेले ‘एक्स-37बी’ हवाईदलासाठी विकसित करण्यात आले होते. मात्र सध्या याची जबाबदारी ‘युएस स्पेस फोर्स’कडे सोपविण्यात आली आहे.

अमेरिकेच्या ‘एक्स-37 स्पेसक्राफ्ट’मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे - रशियन कंपनीच्या प्रमुखांचा दावा‘अधिकृत पातळीवर एक्स-37बी हे यान शास्त्रीय अभ्यासासाठी तसेच टेहळणीसाठी विकसित केल्याचे सांगण्यात येते. पण याची क्षमता व त्याच्याशी संबंधित असलेल्या शक्यतांचा विचार केला तर हे यान किमान तीन अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता बाळगून आहे. मोठ्या आकाराच्या यानावर सहा अण्वस्त्रेही तैनात करता येतील’, असा दावा ‘अल्माझ-अँटे’ या रशियन संरक्षण कंपनीचे प्रमुख यान नोविकोव्ह यांनी केला. रशियात नुकत्याच पार पडलेल्या ‘न्यू नॉलेज’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला.

‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’, क्षेपणास्त्रे व रडार्स बनविणारी ‘अल्माझ-अँटे’ ही संरक्षणक्षेत्रातील आघाडीची रशियन कंपनी म्हणून ओळखण्यात येते. 2014 साली युक्रेन संघर्षातील सहभागावरून या कंपनीवर निर्बंधही लादण्यात आले होते. ‘अल्माझ-अँटे’चे प्रमुख यान नोविकोव्ह यांनी अमेरिकेने सहा ‘एक्स-37बी’ अंतराळात तैनात केल्याचेही म्हटले आहे. 2025 सालापर्यंत अमेरिका दोन नवे ‘एक्स-37बी’ अंतराळात धाडण्याची योजना आखत असल्याचेही नोविकोव्ह यांनी सांगितले. ही गोष्ट रशियासाठी मोठे आव्हान ठरते, असा इशाराही त्यांनी दिला.अमेरिकेच्या ‘एक्स-37 स्पेसक्राफ्ट’मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे - रशियन कंपनीच्या प्रमुखांचा दावा

1999 साली नासाने ‘बोईंग’ कंपनीकडे नवे ‘ऑर्बिटर प्लेन’ विकसित करण्याची जबाबदारी सोपविली होती. 2004 साली हा प्रकल्प अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडे सोपविण्यात आला. त्यानंतर 2006 साली ‘एक्स-37बी’ची पहिली चाचणी घेण्यात आली. ‘रियुजेबल रोबोटिक स्पेसक्राफ्ट’ प्रकारात मोडणार्‍या या यानाच्या मोहिमा व त्यांची उद्दिष्टे याबद्दल संरक्षण विभागाने जबरदस्त गुप्तता पाळली आहे. त्यामुळे याचा उल्लेख ‘मिस्टिरिअस स्पेस प्लेन’ असाही करण्यात येतो.अमेरिकेच्या ‘एक्स-37 स्पेसक्राफ्ट’मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे - रशियन कंपनीच्या प्रमुखांचा दावा

पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये भ्रमण करण्याची क्षमता हे ‘एक्स-37बी’चे वैशिष्ट्य मानले जाते. सप्टेंबर 2017 ते ऑक्टोबर 2019 असे 780 दिवस अंतराळात राहून या यानाने नवा विक्रम नोंदविला आहे. 17 मे 2021 रोजी ‘एक्स-37बी’चे पुन्हा एकदा अंतराळात प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती अमेरिकी यंत्रणांनी दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेने पुन्हा ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मध्ये सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. रशियाने या कराराचे उल्लंघन केल्याने करार कमकुवत झाला आहे, अशा शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पुन्हा सहभागी होण्याचे नाकारले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधून माघारीची घोषणा केली होती. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, जगातील 34 देशांचा समावेश असणार्‍या ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधून बाहेर पडण्यासाठी संसदेत विधेयक दाखल केले होते.

leave a reply