नायजेरियात बोको हरामच्या दहशतवादी हल्ल्यात १८ जणांचा बळी

अबूजा – बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियात घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जणांचा बळी गेला आहे. नायजरच्या सीमेजवळ असलेल्या बोर्नो प्रांतातील कामगारांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला. या महिन्यात बोको हरामने नायजेरियात चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो.

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो प्रांतातील दमासाक भागात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला. नायजरच्या सीमेजवळील ‘लेक छाड’ या तलावाच्या जवळ धान्याचे पिक घेणार्‍यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारीतून आलेल्या बोको हरामच्या दहशतवाद्यांनी गावकर्‍यांवर बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण गव्हर्नर बाबागाना झुलूम यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८ जणांचा बळी गेला तर २१ जण जखमी झाल्याची माहिती दिली.

बोको हरामच्या या कारवाईनंतर नायजेरियाच्या लष्कराने बोर्नो व आसपासच्या भागात लष्करी तसेच हवाई कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांना ठार करण्यात आणि त्यांचे आश्रयस्थान नष्ट करण्यात यश मिळाल्याचा दावा नायजेरियन लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद येरिमा यांनी केला. या कारवाईत किती दहशतवादी ठार झाले, याची माहिती नायजेरियन लष्कराने दिलेली नाही.

गेल्या आठवड्यातही बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या बोर्नो प्रांतात केलेल्या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला होता. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाने उभारलेल्या शिबिरांवरही दहशतवाद्यांनी हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. नायजेरियातील बोको हरामच्या या वाढत्या हल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरातून चिंता व्यक्त केली जाते. या देशाचे संपर्कमंत्री डॉ. ईसा यांचा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप केला जातो. पण डॉ. ईसा यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत.

२००९ सालापासून बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाबरोबरच नायजर, छाड, कॅमेरून या शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात केला आहे. यामध्ये ३० हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून ३० लाखाहून अधिक जण विस्थापित झाल्याचा दावा केला जातो.

leave a reply