ब्रेक्झिटच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्स व इतर युरोपिय देशांच्या बोटी रोखण्यासाठी ब्रिटनकडून इंग्लिश खाडीत चार युद्धनौका तैनात

लंडन – ब्रिटन व युरोपिय महासंघादरम्यान ‘ब्रेक्झिट डील’वर स्वाक्षर्‍या झाल्या असल्या तरी दोन्ही बाजूंमधील तणाव पुढील काही काळ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण करणार्‍या मुद्यांवरून चकमकी उडण्याची शक्यता असून ब्रिटनने त्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनच्या सागरी हद्दीत फ्रेंच ट्रॉलर्स व इतर युरोपिय देशांच्या नौकांनी घुसखोरी करू नये म्हणून चार युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत.

युद्धनौका तैनात

गुरुवारी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी ब्रेक्झिट कराराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या २४ तासांमध्ये ब्रिटन व फ्रान्सला जोडणार्‍या सीमातपासणी नाक्यांवर कुठलाही अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सध्या ब्रिटनसह अनेक युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध लागू आहेत. हे निर्बंध व नववर्षाच्या सुट्ट्या संपून दैनंदिन व्यवहारांना वेग आल्यावर गोंधळ उडू शकतो, असे मानले जाते. त्यासाठी ब्रिटनने अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटन व युरोपिय महासंघामध्ये गेल्या वर्षी झालेल्या वाटाघाटींमध्ये तीन मुद्दे अत्यंत संवेदनशील मानले गेले होते. त्यात ब्रिटनच्या सागरी क्षेत्रातील ‘मासेमारीचा हक्क’ हा मुद्दा सर्वाधिक तणावाचा ठरला होता. ब्रिटीश मच्छिमार व राजकीय गटांनी युरोपिय देशांच्या मच्छिमारी बोटींना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. त्याचवेळी महासंघाचा प्रमुख सदस्य असणार्‍या फ्रान्सने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. ब्रिटनच्या सागरी हद्दीतील मासेमारीचा हक्क व वाटा फ्रान्स सोडणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितले होते. त्याबाबत अपेक्षित निर्णय झाला नाही तर ब्रेक्झिटचा करार होऊ देणार नाही, असेही धमकावण्यात आले होते.

मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोणत्याही परिस्थितीत २०२१ पासून ब्रिटनच्या सागरी हद्दीतील मासेमारीवर ब्रिटनचे नियंत्रण राहिल, असे बजावले होते. ब्रिटनच्या सागरी हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न झाला तर ब्रिटीश नौदल त्यांना प्रत्युत्तर देईल, असा इशाराही जॉन्सन यांनी दिला होता. ब्रेक्झिटसंदर्भात झालेल्या करारात ब्रिटनने फ्रान्ससह इतर देशांच्या बोटींना सागरी हद्दीत येण्याची परवानगी दिली असली तरी त्यावर काही प्रमाणात निर्बंधही घातले आहेत. महासंघाने त्याला मान्यता दिली असली तरी फ्रान्सकडून आक्रमक वक्तव्ये होत असल्याने ब्रिटनने युद्धनौका तैनात केल्याचे दिसत आहे.

ब्रिटनने इंग्लिश खाडीच्या हद्दीत चार युद्धनौका तैनात केल्या असून त्यात ‘एचएमएस ट्रेंट’, ‘एचएमएस टॅमर’, ‘एचएमएस टिन’ व ‘एचएमएस मर्सी’चा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘एचएमएस सेव्हर्न’ ही युद्धनौका आधीच सरावासाठी इंग्लिश खाडीत असल्याने तैनात युद्धनौकांची संख्या पाच झाली आहे. या युद्धनौकांबरोबरच टेहळणीसाठी हेलिकॉप्टर्सही तैनात असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनच्या संरक्षण विभागासह माजी अधिकार्‍यांनीही या तैनातीचे समर्थन केले आहे.

‘ब्रिटनने तैनात केलेल्या युद्धनौका ही प्रतिबंधात्मक कारवाई आहे. ब्रिटीश युद्धनौका परदेशी नौकांविरोधात संघर्ष करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नाहीत. आमच्या सागरी हद्दीच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे, हा संदेश ब्रिटनकडून देण्यात येत आहे’, असे माजी नौदलप्रमुख लॉर्ड अ‍ॅलन वेस्ट यांनी स्पष्ट केले.

leave a reply