ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांचे निधन

लंडन – ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन झाल्याची घोषणा ब्रिटनच्या राजघराण्याने केली. ९९ वर्षाच्या प्रिन्स फिलिप यांच्या निधनाच्या वृत्तानंतर जगभरातून शोकसंदेश येत आहेत. प्रिन्स फिलिप यांनी आपल्या आदर्श वर्तनाने राष्ट्रकूल देश व जगभरातल्या प्रत्येक पिढीतील युवावर्गाचे प्रेम संपादन केले होते, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रिन्स फिलिप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रिन्स फिलिप यांनी २०१७ सालापासून राजघराण्यातील सेवांपासून निवृत्ती पत्करली होती. १७ फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते ब्रिटनच्या राजघराण्याचे निवासस्थान असलेल्या विंडसर कॅसलमध्ये परतले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जनतेने विंडसर कॅसलच्या बाहेर विविध प्रकारची फुले ठेवून प्रिन्स फिलिप यांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

१० जून १९२१ रोजी जन्म झालेल्या प्रिन्स फिलिप यांचा त्यावेळच्या ब्रिटनच्या राजकन्या एलिझाबेथ यांच्याशी १९४७ साली विवाह झाला होता. याला सात वर्षे उलटल्यानंतर एलिझाबेथ ब्रिटनच्या महाराणी बनल्या. ७३ वर्षांच्या काळात त्यांना सहाय्य करण्याचे कर्तव्य प्रिन्स फिलिप यांनी निष्ठेने पार पाडले, याचा गौरवपूर्ण उल्लेख ब्रिटनची माध्यमे करीत आहेत. चार मुले, आठ नातवंडे आणि १० पंतवंडे असा प्रिन्स फिलिप व राणी एलिझाबेथ दुसर्‍या यांचा परिवार आहे.

leave a reply