डाव्या दांभिक विचारसरणीविरोधात ब्रिटीश सरकार आक्रमक

लंडन – अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी अतिडाव्या गटांच्या चौकशीचे आदेश देणार्‍या ब्रिटीश सरकारने डाव्या दांभिक विचारसरणीच्या गटांविरोधातील आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी या विचारसरणीविरोधात हल्लाबोल केला असून डावी दांभिक विचारसरणी व बहिष्काराची संस्कृती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, ब्रिटनमध्ये वंशद्वेष व हवामानबदल यासारख्या मुद्यांवर होणार्‍या आंदोलनांमध्ये घुसखोरी करणार्‍या आक्रमक, अतिडाव्या गटांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यापूर्वी अतिडावे गट विविध आंदोलनातील हिंसक व अराजकवादी घटनांसाठी कारणीभूत असल्याचे आरोप ब्रिटनमधील काही संसद सदस्य तसेच मंत्र्यांनी केले होते. याकडे लक्ष वेधताना अशा गटांचे वर्तन अस्वीकारार्ह असल्याचे जाणीवही ब्रिटनमधील सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्यांनी करून दिली होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जॉन्सन सरकारमधील मंत्र्यांनी अतिडावे दांभिक विचारसरणीचे गट व बहिष्काराच्या संस्कृतीविरोधात ठोस कारवाईचे संकेत दिले आहेत. ब्रिटनचे शिक्षणमंत्री गेव्हिन विल्यमसन यांनी ब्रिटनमधील शिक्षणसंस्थांसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यात ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍यांना सर्व विषयांवर व्यक्त होण्याचे तसेच विविध विषयांचा अभ्यास करण्याचे मुक्त स्वातंत्र्य असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये बेकायदा ‘सायलेन्स कल्चर’ वाढत असल्याचा दावा करून त्याचा विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांवर विपरित परिणाम होत असल्याचे विल्यमसन यांनी बजावले. नव्या नियमांमध्ये विद्यार्थ्यांचे अथवा शिक्षकांचे गट शिक्षणसंस्थेत आपले मत मांडायला येणार्‍या विशिष्ट विचारसरणीच्या वक्त्यावर बंदी घालू शकणार नाही, अशीही तरतूद आहे.

ब्रिटनचे हाऊसिंग मिनिस्टर ख्रिस्तोफर पिंचर यांनी लंडनचे मेयर सादिक खान यांना पत्र लिहून, डाव्या विचारसरणीच्या गटांसाठी जनतेचा पैसा उधळविणे थांबवा असे बजावले आहे. मेयर सादिक खान यांनी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ गट तसेच डाव्या विचारसरणीचे समर्थक असलेल्या सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.

या समितीने, ब्रिटनच्या इतिहासाचा भाग असलेले लंडनमधील काही पुतळे काढून टाकण्याची आक्रमक मागणी केली आहे. त्यावर टीका सुरू झाली झाली असून सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी लंडनच्या मेयरना यावर पाठविलेले खरमरीत पत्र ब्रिटनमध्ये गाजत आहे. तर ब्रिटनचे सांस्कृतिक मंत्री ऑलिव्हर डाऊडन यांनीही देशातील सांस्कृतिक ठेवा जपण्याची जबाबदारी असणार्‍या यंत्रणांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. या यंत्रणांकडे इतिहास व सांस्कृतिक ठेवा राखण्याचे कार्य सोपविले आहे, त्यात बदल करण्याचे अथवा त्याबाबत खुलासे देण्याचे काम नाही, असे डाऊडन यांनी बजावले आहे.

ब्रिटनमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘रिक्लेम पार्टी’ या पक्षानेही डाव्या दांभिक विचारसरणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पक्षाचे प्रमुख असणार्‍या लॉरेन्स फॉक्स यांनी, डाव्या दांभिक विचारसरणीला पाठिंबा देणार्‍या व्यक्ती ब्रिटनविरोधी असल्याचा दावा केला आहे.

बहिष्कार टाकण्याच्या संस्कृतीमुळे ब्रिटीश नागरिकांना एखाद्या मुद्यावर स्वतंत्रपणे बोलण्याची भीती वाटू लागल्याचेही त्यांनी बजावले. दरम्यान, ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक असणार्‍या ‘द टेलिग्राफ’ने डाव्या विचारसरणीशी निगडित गटांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात ब्रिटनमध्ये वंश, संस्कृती व इतिहासाबाबतची जुनी भूमिका जाणीवपूर्वक बदलण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण देणारे गट व संस्था डाव्या दांभिक विचारसरणीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

ब्रिटनमधील विविध कंपन्या तसेच यंत्रणांमध्ये अशा गटांकडून प्रशिक्षण देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. मात्र जॉन्सन सरकारने प्रशासनातील कर्मचार्‍यांसाठी असे प्रशिक्षण नाकारल्याचा उल्लेख दैनिकाने आपल्या वृत्तात केला आहे.

leave a reply