लष्करासाठी संपर्क प्रणालीच्या प्रकल्पाला ‘सीसीएस’ची मंजुरी

नवी दिल्ली – लष्कराच्या युद्ध सज्जतेचा दृष्टीने अतिशय महत्वाच्या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) मंजुरी दिली आहे. ‘सीसीएस’ने लष्करासाठी सुरक्षित संपर्क प्रणाली उभारण्यासाठीच्या प्रकल्पाला मान्यता दिली. या प्रकल्पासाठी ७८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय लष्करासाठी 10 लाख ग्रेनेड खरेदी करण्याची ऑर्डर ही ‘सीसीएस’ने मंजूर केली आहे.

'सीसीएस'

लष्करासाठी सुरक्षित संपर्क प्रणाली असावी त्यासाठीचा प्रस्ताव बराच काळ रखडलेला होता. सध्या चीनमधील वाढलेला तणाव आणि भविष्यातील सुरक्षेच्यादृष्टीने इतर आव्हाने पाहता ‘सीसीएस’ने सुरक्षित संपर्क प्रणालीसाठी ‘आर्मी स्टॅटिक स्विच कम्युनिकेशन नेटवर्क’ (एएससीओएन) प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे .

याअंतर्गत लष्करासाठी विशेष संपर्क यंत्रणा उभारण्यात येणार असून सीमाभागात विशेषतः चीनला लागून असलेल्या सीमाक्षेत्रात संपर्क मजबूत होणार आहे. यामुळे ‘एलएसी’च्या ताज्या परिस्थितीवर लष्कराला बारीक नजर ठेवता येईल. सीमाभागातील काही दुर्गम भागांमध्ये संपर्क सुविधा अद्यापही चांगल्या नाही. हे संघर्ष काळात मोठे आव्हान ठरू शकते. याचा विचार करून युद्ध सज्जतेचासाठी ही संपर्क सुविधा सुधारण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी ७ हजार ७९६ कोटी रुपये खर्च होणार असून यासंदर्भात गुरुवारी इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड बरोबर एका करारावर ही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्याशिवाय मेक इन इंडिया अंतर्गत १० लाख हॅन्ड ग्रेनेड लष्करासाठी खरेदी केली जाणार आहेत. यासाठी ४०९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारतीय सुरक्षादल अजूनही दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुन्या डिझाईनचे ग्रेनेड वापरत आहेत. नवे हँड ग्रेनेड या जुन्या डिझाईनच्या हँड ग्रेनेडची जागा घेतील. यासाठी एका प्रायव्हेट कंपनी बरोबर करार करण्यात आला आहे.

leave a reply