कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळ, महाराष्ट्रासह 10 राज्यांना इशारा

- महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या वाढीवर चिंता

नवी दिल्ली – सलग पाचव्या दिवशी देशात चोवीस तासात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासात आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या खाली गेल्यावर पुन्हा अचानक वाढलेल्या या रुग्ण संख्येने चिंता वाढविल्या आहेत. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळत असले, तरी इतर काही राज्यातही रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातही कोरोना वाढीचा दर जास्त असल्यावर केंेद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. मायक्रो कटेंन्मेंट झोनची संख्या वाढवा, ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा, अशा सूचना केंद्राने 10 राज्यांना दिल्या आहेत.

कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळ, महाराष्ट्रासह 10 राज्यांना इशारा - महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या वाढीवर चिंताकेरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीशा, आसाम, मिझोराम, मेघालया आणि मणिपूर या राज्यांना केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत असून पॉझिटिव्ह दर वाढला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारतात रविवारच्या सकाळपर्यंत 41 हजार 831 नवे रुग्ण आढळले होते. यातील सुमारे निम्मे रुग्ण हे केरळात आढळले. रविवारीही केरळात दिवसभरात 20 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात चोवीस तासात 6 हजार 479 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 157 जणांचा मृत्यू झाला. देशात महाराष्ट्रातच सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात येत आहेत. तर दुसर्‍या बाजूला कोरोनाच्या बरे होणार्‍या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.

देेशात 46 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर हा 10 टक्क्यांहून अधिक आहे, तर 56 जिल्ह्यांमध्ये हा दर 5 ते 10 टक्क्यांच्यामध्ये आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्ण नोंदविलेल्या देशातील जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्हे आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे सांगलीत आढळले आहेत. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, बिड आणि रायगड या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. यामध्ये सातार्‍यातील पॉझिटिव्ह दर सर्वाधिक आहे. सातार्‍यात 8 टक्के, पुण्याचा पॉझिटिव्ह दर 7.23 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना लसीकरण वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केरळातील वाढलेली रुग्ण संख्या आणि महाराष्ट्रात वाढू लागलेली रुग्ण संख्या तिसर्‍या लाटेची सुरूवात असून शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

leave a reply