वायुसेनाप्रमुख भदौरियाही लडाखच्या दौर्‍यावर

वायुसेनाप्रमुखसंरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया लडाखच्या दौर्‍यावर आहेत. वायुसेनाप्रमुखांनी लडाखमधील ‘दौलत बेग ओल्डी’, ‘थॉयसे’ आणि ‘नायमा’ या हवाई तळांना भेट देऊन इथल्या संरक्षणसिद्धतेचा आढावा घेतला. तसेच लेह येथील हवाई तळावर संरक्षणदलप्रमुख जनरल रावत व वायुसेनाप्रमुख भदौरिया यांची लष्करी तसेच वायुसेनेच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखच्या एलएसीला भेट दिली होती. त्यानंतर संरक्षणदलप्रमुख व वायुसेनाप्रमुख लडाखच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी वायुसेनाप्रमुखांनी अत्यंत कडक हिवाळ्यातही भारतीय सेनादलांचे मनोधैर्य अत्युच्च पातळीवरील असल्याचे सांगून त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, लडाखमधला ‘दौलत बेग ओल्डी’ हवाई तळ भारताने विकसित केल्यानंतर चीन त्याकडे अत्यंत संशयाने पाहत आहे. हा तळ चीन व पाकिस्तानला जोडणार्‍या काराकोरम महामार्गापासून जवळ असून याचा वापर करून भारत ‘अक्साई चीन’ ताब्यात घेईल अशी भीती चीनला वाटू लागलेली आहे. म्हणूनच चीन भारताच्या या क्षेत्रात आपल्या लष्कराची सातत्याने घुसखोरी करून भारतीय लष्कराचा मार्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आला आहे.

leave a reply