चीनकडून कंबोडियात संरक्षणतळ उभारण्याच्या हालचालींना वेग

- अमेरिकेची तीव्र नाराजी

संरक्षणतळबीजिंग/नॉम पेन्ह/वॉशिंग्टन – कंबोडियातील ‘रिअम नॅव्हल बेस’वर चीनकडून नव्या सुविधा उभारण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘एएमटीआय’ या अभ्यासगटाने यासंदर्भात दावा केला असून सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. कंबोडियाच्या तळावर सुरू असणार्‍या या हालचालींवर अमेरिकेने आक्षेप घेतला असून कंबोडिया सरकार पारदर्शकता राखत नसल्याचा आरोप केला आहे.

चीनच्या ‘साऊथ चायना सी’ व नजिकच्या सागरी क्षेत्रातील विस्तारवादी कारवायांवर ‘आसियन’ देशांकडून तीव्र प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झाली आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर यासारख्या प्रमुख देशांनी चीनचे दडपण झुगारून स्वतंत्र धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने कंबोडिया, लाओस, म्यानमार यासारख्या देशांशी जवळीक साधत ‘आसियन’वर दबाव टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कंबोडियामधील चीनची वाढती गुंतवणूक व संरक्षण सहकार्य त्याचाच भाग ठरतो.

गेल्या दशकात चीन व कंबोडियामध्ये गोपनीय संरक्षण करार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या करारानुसार, कंबोडियाने चीनला आपल्या नौदल तळाचा वापर संरक्षणतळ म्हणून करण्याची परवानगी दिली आहे. त्याबदल्यात चीन कंबोडियाला संरक्षणयंत्रणा पुरविणार असून पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूकही करणार आहे. मात्र कंबोडियाने अशा प्रकारचा करार झाल्याची बाब नाकारली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे उत्तर देणेही कंबोडियाने टाळले.

या पार्श्‍वभूमीवर ‘एशिया मेरिटाईम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह’ या अभ्यासगटाने कंबोडियाच्या ‘रिअम’ नौदल तळावर चीनकडून सुरू असलेल्या बांधकामाची माहिती प्रसिद्ध केली. ही माहिती प्रसिद्ध करताना सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा आधार घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात चीनने कंबोडियाच्या तळावर वेगाने इमारती व इतर सुविधा उभारल्याचे या फोटोग्राफ्समध्ये दिसून येत आहे. हे बांधकाम चीनकडून रिअमचा वापर संरक्षणतळ म्हणून करण्याच्या हालचालींचा भाग असू शकतो, असा दावाही कण्यात येत आहे.

संरक्षणतळगेल्या वर्षभरात चीनने चार इमारती उभारल्या असून नव्या रस्त्याचेही बांधकाम सुरू केले आहे. या तळापासून जवळच चीनच्या कंपनीकडून मोठ्या रिसॉर्टची योजनाही आखण्यात आल्याचे समोर येत आहे. चीनच्या या हालचालींबाबत अमेरिकेने कंबोडियाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी वेंडी शेरमन यांनी कंबोडियाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी चीनच्या हालचालींबाबत सवाल केले होते. मात्र कंबोडियाने त्याबाबत ठोस उत्तरे देण्याचे टाळले होते, असा दावा अमेरिकी सूत्रांनी केला. ‘एएमटीआय’ या अभ्यासगटाच्या दाव्यानंतरही अमेरिकेने चीनच्या हालचालींवर चिंता व्यक्त केली असून कंबोडिया सरकार योग्य पारदर्शकता दाखवित नसल्याचा ठपका ठेवला आहे.

रिअम तळावर चीनला संरक्षणतळाची परवानगी देत असतानाच अमेरिकेने या तळावर उभारलेल्या लष्करी सुविधा पाडण्यात आल्या आहेत. अमेरिकेने गेल्या दशकात कंबोडियाला दोन लष्करी सुविधांची उभारणी करून दिली होती. मात्र कंबोडिया सरकारने गेल्या वर्षी कोणतेही कारण न देता अमेरिकेने उभारलेल्या लष्करी इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. कंबोडियात चीनला संरक्षणतळ मिळाल्यास त्याचा वापर चीन आग्नेय आशियातील आपल्या कारवाया वाढविण्यासाठी करील, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply