चीनच्या कारवाया चिथावणीखोर आणि अस्वस्थ करणाऱ्या

- भारत-चीन सीमेवरील तणावावर अमेरिकेची प्रतिक्रिया

नवी दिल्ली/वॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून भारतीय सीमेवर सुरु असलेल्या कारवायांवर अमेरिकेने टीका केली आहे. चीनच्या या कारवाया चिथावणीखोर असून चीन आपल्या वाढत्या बळाचा वापर कशारीतीने करतो, हे यातून स्पष्ट होते, अशा शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मध्य आणि दक्षिण आशियासाठीच्या उपमंत्री एलिस वेल्स यांनी चीनचा समाचार घेतला. भारत आणि चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनकडून सुरु असलेले बळाचे अतिरेकी प्रदर्शन करणीभूत असल्याचा ठपका ठेवून वेल्स यांनी भारताची बाजू उचलून धरल्याचे दिसत आहे. भारताची सीमा आणि साऊथ चायना सी मधील अशा आक्रमक कारवायांमुळे समान विचारांचे देश एकत्र येत आहेत, याकडे वेल्स यांनी लक्ष वेधले. वेल्स यांची ही प्रतिक्रिया चीनला चांगलीच झोंबली असून चीनने भारताबरोबर राजनैतिक मार्गाने चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे यामध्ये पडू नये, असा सल्लाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

लडाख, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चीनकडून घुखोरीचे प्रयत्न झाले होते. लडाखमध्ये सध्या गलवान नदी क्षेत्रात दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले असून दोन्ही देशांच्या सैनिकांनी येथे आपले तंबू ठोकले आहेत. तसेच सैन्य तैनातीही वाढविली आहे. चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधून लडाखमधील परिस्थीतीसाठी भारताच जबाबदार असल्याची आगपाखड करण्यात आली होती. भारतीय सैनिकांनीच सीमा ओलंडल्याचा उलटा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय सैनिकांनी सीमाक्षेत्राचे उल्लंघन केल्याचे आरोप केले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनकडून सुरु असलेल्या या आरोपांना उत्तर दिले आहे. भारतीय सैनिक गस्त घालत असताना चिनी सैनिकांनीच अडथळे आणले. भारतीय सैनिकांना सीमेवरील परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. त्यांची गस्त भारतीय सीमेतच सुरु होती आणि भारतीय सैनिक सीमेच्या सुरक्षेसाठी निर्धारित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतात, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच याप्रश्नी चीनबरोबर चर्चा सुरु आहे, असे सांगून भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे संकेत परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.

याआधी लडाखमधील भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मध्य आणि दक्षिण आशियासाठीच्या उपमंत्री एलिस वेल्स यांनी या तणावासाठी चीनची आक्रमकता आणि चिथावणीखोर धोरण जबाबदार असल्याचे म्हटले होते. भारताबरोरील सीमा वाद असो किंवा साऊथ चायना सीमधील प्रश्न असो, आक्रमक आणि चिथावणीखोर कारवाया करीत राहणे हीच चीनची कार्यपद्धती राहिलेली आहे. संपूर्ण ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रावर चीन आपला हक्क सांगतो. हे सागरी क्षेत्र खनिज साठ्यानी संपन्न असून जगातिक बहुतांश व्यापारी वाहतूक या क्षेत्रातून होते. यामुळेच चीनच्या या क्षेत्रात सुरु असलेल्या अरेरावी विरोधात समविचारी देश एकत्र येत आहेत, असे सूचक विधान वेल्स यांनी केले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जगाच्या नव्या आर्थिक फेररचनेत चीनच्याविरोधात समविचारी देशांचे एकत्र येणे ही लक्षवेधी बाब ठरते, असे सांगून जेष्ठ मुत्सद्दी वेल्स यांनी चीन दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीची भूमिका पार पाडत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.

तसेच वेल्स यांनी अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियामधील क्वाड सहकार्याचा उल्लेख यावेळी विशेष उल्लेख केला. तसेच चीनचे सर्वच देशांबरोबर सुरु असलेले सीमावाद चीनपासून असलेला धोका अधोरेखित करत आहे, असे सांगून वेल्स यांनी चीन जगासाठी धोकादायक असल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply