चीन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सत्यही दडवित आहे

-चिनी मानवाधिकार कार्यकर्तीचा आरोप

बीजिंग – कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या वुहानमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. वुहानच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह बेवारस पडलेले आढळत आहेत. तर या शहरातील नागरी वस्त्या, इमारती स्टील पॅनल्सनी सील केल्या जात असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. काही इमारतींमध्ये पूर्णपणे काळोख असून चीन सरकार वुहानबाबतचे सत्य नव्याने दडवित असल्याचा आरोप चिनी मानवाधिकार कार्यकर्ती जेनिफर झेंग यांनी केला आहे.

कोरोनाव्हायरसचे उगम स्थान असलेल्या वुहान शहरात या साथीची दुसरी लाट धडकली असून चीन सरकारने वुहानमधील नागरिकांची फेरचाचणी सुरू केली आहे. आतापर्यंत आपण लाखो जणांची चाचणी केल्याचा दावा चीन सरकार करीत आहे. पण वुहानमधील जनता या चाचणीला सामोरे जाण्यास नकार देत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. चाचणीमुळे आपल्याला पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, अशी भीती वुहानमधील जनतेला सतावित आहे. तर काही ठिकाणी चीनच्या सुरक्षायंत्रणा नागरिकांना खेचून फेरचाचणीसाठी आणत असल्याचा घटनाही घडल्या आहेत. हे सारे घडत असताना, वुहान शहरातील काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.

गेल्या आठवड्यात वुहानच्या रस्त्यावर एक व्यक्ती चालता-चालता कोसळल्याची घटना व्हिडिओतून समोर आली आहे. कोसळल्या क्षणीच त्या व्यक्तीच मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोरोनाच्या भयापोटी स्थानिकांनी या मृतदेहाच्या जवळ जाण्याची टाळले. पुढे सुरक्षा यंत्रणांनी पीपीई किट्सह या मृतदेहाला उचलून नेले आणि सदर भाग काही काळासाठी निर्बंधित केला. याआधी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातही वुहानच्या रस्त्यावर अशाच प्रकारे मृतदेह पडून राहिलेले व्हिडिओज समोर आले होते. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यात वुहानमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा दावा, चिनी वंशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका झेंग यांनी केला आहे.

तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्याप्रमाणे वुहानमधील काही इमारती, नागरी वस्त्या लोखंडी फळ्या ठोकून सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागल्यामुळे वुहानमधील प्रशासनाने ही कारवाई हाती घेतल्याचा दावा केला जातो. येथील एका भागात १८० जण एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सदर इमारत स्टील रोडने सील केल्याचा व्हिडिओही झेंग यांनी प्रसिद्ध केला आहे. काही स्थानिकांच्या मते वुहानमधील परिस्थिती याआधीपेक्षाही अधिक गंभीर बनली आहे. स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन अधिक कठोरपणे कारवाई करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असल्याचे झेंग यांनी सांगितले.

झेंग यांनी याआधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वुहानच्या काही भागातील इमारती ‘ब्लॅक आउट’ झाल्या असून या इमारतीमधील रहिवाशी संशयास्पदरीत्या गायब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. चीनने याआधी वुहानबाबत लपवाछपवी केली असून आताही तेच करीत असल्याचा आरोप झेंग यांनी केला. त्याचवेळी वुहानमध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग करणाऱ्या आणखी एका पत्रकाराला अटक झाल्याची बातमी समोर येत आहे. चीन सरकारचे नियम मोडून बातमी लाइव्ह प्रदर्शित करणार्‍या पत्रकाराला अटक करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे वुहानमधील दुसऱ्या लाटेचे सत्यही चीन दडवित असल्याचे दिसत आहे.

leave a reply