चीनमधील जोडप्याला तीन मुलांची परवानगी देणारा कायदा मंजूर

तीन मुलांची परवानगीबीजिंग – चीनच्या संसदेने विवाहित जोडप्याला चीन मुलांची परवानगी देणारा कायदा मंजूर केला आहे. काही महिन्यांपूर्वी चीनमधील जनगणनेची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्यात वृद्धांची संख्या वाढत असतानाच सलग चार वर्षे चीनमधील लोकसंख्यावाढीचा दर घसरत असल्याचे उघड झाले होते. यामुळे चिनी अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याचे इशारेही देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने मंजूर केलेला कायदा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

चीनमध्ये सातत्याने लोकसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी 1979 साली तत्कालिन कम्युनिस्ट राजवटीने ‘वन चाईल्ड पॉलिसी’ लादली होती. या धोरणामुळे गेल्या साडेतीन दशकात चीनने आपल्या लोकसंख्येत 40 कोटींची भर पडण्यापासून रोखण्यात यश मिळविल्याचे दावे करण्यात येतात. मात्र त्याचे विपरित परिणामही समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर 2016 साली हे वादग्रस्त धोरण रद्द करण्यात आले. त्यानंतर चीनमधील जोडप्यांना दोन मुलांची परवानगी देण्यात आली होती.

मात्र तोपर्यंत चिनी जोडप्यांची बदललेली मानसिकता व जीवनशैलीतील बदल यामुळे लोकसंख्येत विशेष फरक पडलेला नाही. उलट चिनी नागरिक मुलांना जन्म देण्यात टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले होते. याचे परिणाम अर्थव्यवस्था तसेच सामाजिक स्थितीवर दिसण्यास सुरुवात तीन मुलांची परवानगीझाल्यानंतर चीनने पुन्हा आपले धोरण बदलण्याचा निर्णय घेतला होता. जनगणनेचा अहवाल समोर आल्यानंतर काही दिवसातच ‘थ्री चाईल्ड पॉलिसी’चे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर आता अवघ्या तीन महिन्यात कायदा मंजूर करून चीनने त्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी दोन मुलांसाठी दिलेल्या परवानगीचा विशेष फायदा न झाल्याने यावेळी जोडप्यांना विशेष सहाय्य पुरविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात मुलांचा विमा, शिक्षणाचा खर्च, करांमध्ये कपात व इतर अर्थसहाय्याचा समावेश असणार आहे. मात्र दोन मुलांसंदर्भातील धोरण फसल्यानंतर तीन अपत्यांचे धोरण यशस्वी ठरेल का, यावरही शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

चीनची अर्थव्यवस्था अजूनही उत्पादन क्षेत्रावर अवलंबून असून घटत्या जन्मदरामुळे या क्षेत्रासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरेल, असे सांगण्यात येते. त्याचवेळी जन्मदर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास त्याने ग्रामीण भागातील गरीबी व बेरोजगारी पुन्हा वाढेल आणि चीनच्या सामजिक स्थैर्याला धक्का बसेल, अशी चिंता चीनमधील काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply