पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये चीन मोठा नौदल तळ उभारत आहे – अमेरिकेतील लष्करी अभ्यासकाचा दावा

वॉशिंग्टन – हिंदी महासागर क्षेत्रातील आपली पकड मजबूत करण्यासाठी चीन पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात सर्वात मोठा नौदल तळ उभारत आहे. अमेरिकेतील आघाडीच्या लष्करी अभ्यासकाने सॅटेलाइट फोटोग्राफ प्रसिद्ध करून ही माहिती उघड केली आहे. लडाखच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती करून भारताला आव्हान देणाऱ्या चीनने पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात नौदल तळ उभारण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकेल, असे या अभ्यासकाने बजावले आहे.

Pakistan, China

‘चायना पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर’च्या (सीपीईसी) अंतर्गत चीन पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये व्यापारी बंदराबरोबर नौदलतळ विकसित करीत असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानच्या कराची बंदराला पर्याय म्हणून चीन ग्वादरमध्ये हा नौदलतळ उभारत असल्याचे दावे त्यावेळी करण्यात आले होते. पण, आपण ग्वादर बंदराचा विकास करीत असल्याचे सांगून चीनने येथील नौदलतळाच्या बातम्या खोडून काढल्या होत्या. मात्र, लष्करी अभ्यासक ‘एच. आय. सटन’ यांनी अमेरिकी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात चीन ग्वादर बंदरात उभारत असलेल्या सर्वात मोठ्या नौदल तळाची माहिती उघड केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये चीनने ग्वादर बंदरात आपल्या जवानांसाठी वसाहती तसेच संरक्षित क्षेत्र उभारल्याची माहिती सटन यांनी सॅटेलाइट फोटोग्राफ प्रसिद्ध करून दिली. सदर संरक्षित क्षेत्र भल्यामोठ्या भिंती, सुरक्षा चौक्या, काटेरी कुंपणे, लष्करी मनोरे आणि नौदलतळासाठी आवश्यक असलेल्या सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे. जगातील कुठल्याही व्यापारी बंदरावर अशा प्रकारे संरक्षित क्षेत्र आणि लष्करी वसाहती उभारल्या जात नसल्याचे सटन यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आपल्या विनाशिकांच्या तैनातीसाठी चीन ग्वादरमध्ये सर्वात मोठे नौदलतळ विकसित करीत असल्याचा दावा सटन यांनी केला आहे.Pakistan, China

याआधी भारतीय लष्करी विश्लेषकांनी देखील ग्वादरमध्ये चीनच्या सुरू असलेल्या नव्या हालचालींची नोंद केली होती. आफ्रिकेतील जिबौतीप्रमाणे चीन पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात तळ विकसित करीत असल्याचा आरोप भारतीय विश्लेषकांनी केला होता. ग्वादरमधील चीनचा हा नौदलतळ हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी सामर्थ्याला आव्हान देणारे ठरेल, असा इशाराही या विश्लेषकांनी दिला होता. तर चीनच्या सामर्थ्याचा वापर करुन पाकिस्तान भारताला आव्हान देऊ पाहत आहे व त्यासाठी आपल्या ग्वादर बंदरावर पाणी सोडण्याची तयारी केल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या.

चीन व पाकिस्तानमध्ये विकसित होत असलेला ‘सीपीईसी’ प्रकल्प हा केवळ पायाभूत सुविधांच्या विकासपुरता मर्यादित नसून यामागे चीनची व्यूहरचनात्मक खेळी असल्याचे पाकिस्तान विश्लेषकांनी मान्य केले होते. त्यामुळे या प्रकल्पाकडे पाकिस्तान भारतापासून संरक्षण करणारे कवच म्हणून पहात आहे. यासाठी आपले ग्वादर बंदर चीनच्या हवाली करण्याची तयारी पाकिस्तानने फार आधीच केली होती. म्हणूनच हे बंदर पाकिस्तानकडून नाहीतर चीनकडून वापरले जात आहे, असे आरोप खुद्द पाकिस्तानात झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, चीन ग्वादर बंदरात आपल्या नौदलाचा तळ उभारीत असल्याची बाब ‘ओपन सिक्रेट’ असल्याचे बोलले जाते.

आपले ग्वादर बंदर चीनच्या हाती सोपवून पाकिस्तान भारताच्या सुरक्षेला आव्हान देत असताना, भारताने इराणचे छाबहार बंदर विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. याद्वारे भारत पाकिस्तान व चीनच्या डावपेचांना प्रत्युत्तर देत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply