झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या मुद्यावरून चीनचे युरोपिय महासंघावर टीकास्त्र

ब्रुसेल्स/बीजिंग – झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या भेटीसंदर्भात युरोपिय महासंघाने घातलेल्या अटी अन्यायकारक असून महासंघाची यासंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याची टीका चीनने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अमेरिका व युरोपिय देशांकडून चीनने निष्पक्ष निरीक्षकांना झिंजिआंगमध्ये प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. मात्र चीनने चौकशीची मागणी फेटाळली असून ही भेट मैत्रीपूर्ण असावी, असे बजावले आहे.

झिंजिआंगमधीलकाही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेने झिंजिआंगमधील उघुरवंशियांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने तब्बल 11 लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर जगातील अधिकाधिक देश चीनकडून झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या कारवायांविरोधात उघड आवाज उठवित आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरांवर चाललेले अत्याचार म्हणजे वंशसंहार असल्याचा ठपका ठेवला आहे. इतर देशांमध्येही या स्वरुपाचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे.

काही दिवसांपूर्वी जीनिव्हात झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत, उघुरवंशियांवर होणार्‍या अत्याचारांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, चौकशीसाठी चीनने संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अधिकार्‍यांसह निष्पक्ष निरीक्षकांना झिंजिआंगमध्ये प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनाला 40हून अधिक देशांनी समर्थन दिले होते. त्यानंतर युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र विभागाने झिंजिआंगसंदर्भात स्वतंत्र निवेदनही प्रसिद्ध केले होते.

झिंजिआंगमधील

या निवेदनात, महासंघाकडून झिंजिआंगसंदर्भातील भूमिका अधिक कठोर करण्याचे संकेत देण्यात आले होते. झिंजिआंगमधील कंपन्यांकडून उघुरवंशियांचा गुलामांसारखा वापर होत असल्याची प्रकरणे समोर आली होती. अशा कंपन्यांच्या बाबतीत युरोपिय महासंघाकडून कडक नियमावली प्रसिद्ध करण्यात येईल, असे महासंघाच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले होते. निवेदनात चीनकडून उघुरवंशिय कार्यकर्त्यांवर होणार्‍या अत्याचारांचाही उल्लेख करण्यात आला होता. यावर चीन चांगलाच बिथरला असून युरोपिय महासंघावर टीकास्त्र सोडले आहे.

झिंजिआंगमधील भेटींबाबत चीन संयुक्त राष्ट्रसंघटना व युरोपिय देशांच्या संपर्कात असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र युरोपिय महासंघाने झिंजिआंगमधील भेटीसंदर्भात न स्वीकारता येण्याजोग्या शर्ती लादल्याचा आरोप चीनने केला आहे. या अटी कोणत्याही सार्वभौम देशाला मान्य होणार्‍या नसून महासंघाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची तीव्र नाराजी चीनने व्यक्त केली आहे. महासंघावर चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा ठपकाही चीनने ठेवला आहे.

चीनमधील मानवाधिकारांचे हनन यापुढे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असा इशारा अमेरिका व युरोपिय महासंघाकडून चीनला दिला जात आहे. तर या मुद्यावर आपण पाश्‍चिमात्यांशी टक्कर घ्यायला तयार असल्याचा संदेश चीन देत आहे. यामुळे युरोपिय महासंघाबरोबरील चीनचे व्यापारी सहकार्य धोक्यात आले आहे. त्याची आपल्याला पर्वा नसल्याचे चीनचे म्हणणे आहे.

leave a reply