‘कोरोना’द्वारे जैविक युद्ध सुरू केल्याचा आरोप चीनने नाकारला

बीजिंग – पाच वर्षांपूर्वीच तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून कोरोनाच्या विषाणूचा वापर करण्याची तयारी चीनने केली होती, असा धक्कादायक दावा करणारी कागदपत्रे अमेरिकेच्या हाती लागली आहेत. त्यामुळे जगभरात थैमान घालत असलेली कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याच्या आरोपांना दुजोरा मिळत आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी तसे स्पष्ट संकेत दिले होते. सध्या अमेरिकेत आश्रय घेतलेल्या चीनच्या संशोधकांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. या आरोपांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप सपशेल खोटे असल्याचा दावा केला.

‘कोरोना’द्वारे जैविक युद्ध सुरू केल्याचा आरोप चीनने नाकारलाचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी आपल्या देशावरील हे आरोप सपशेल खोटे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील काहीजणांनी चीनमधील तथाकथित गोपनिय कागदपत्रांचा दाखला देऊन केलेले आरोप म्हणजे यातील गोष्टींचा विपर्यास ठरतो किंवा हा चीनच्या विरोधातील विषारी प्रचाराचा भाग असावा, अशी टीका चुनयिंग यांनी केली आहे. उलट अमेरिकाच जैविक युद्धावर संशोधन करीत असल्याचे आरोप चुनयिंग यांनी केले आहेत. अमेरिकेने जगभरात ‘बायो रिसर्च’ अर्थात जैविक संशोधन करणार्‍या शेकडो प्रयोगशाळा उभारल्या आहेत, असा ठपका चुनयिंग यांनी ठेवला. तर दुसर्‍या बाजूला चीन या आघाडीवर जबाबदार देश असल्याचा दावा चुनयिंग यांनी केला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेली ही प्रतिक्रिया व बचाव अपेक्षित स्वरुपाचा आहे. मात्र आपल्यावरील गंभीर आरोपांना समाधानकारक उत्तर चीनला देता आलेले नाही. याआधी चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू होते, ही माहिती चिनी संशोधिकेने जगजाहीर केली होती. अमेरिकेत आश्रय घेतल्यानंतरच या संशोधिकेला हा गौप्यस्फोट करता आला. तर कोरोनाच्या साथीबाबत चीनच्या यंत्रणांना सावधानतेचा इशारा देणारे डॉक्टर संशयास्पदरित्या चीनमधून बेपत्ता झाले आहेत.

२०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात वुहानमध्ये ही साथ पसरली. त्यानंतर बराच काळ चीनने याची माहिती जगासमोर येऊ दिली नाही. ही साथ फैलावल्यानंतरही चीन याबाबतची माहिती उघड करण्यास तयार नव्हता. वुहानमधून ही साथ चीनच्या इतर भागांमध्ये पसरली आणि त्यानंतर जगभरात याचा फैलाव सुरू झाला. तरीही चीनने या साथीचा उगम वुहानमधून झाल्याचे अमान्य केले होते. त्यामुळे चीन आपली विश्‍वासार्हता पूर्णपणे गमावून बसला आहे. आपल्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी ताकदीचा वापर करून, चीन आपल्या विरोधात केले जाणारे हे गंभीर आरोप दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते.‘कोरोना’द्वारे जैविक युद्ध सुरू केल्याचा आरोप चीनने नाकारला

कोरोनाच्या साथीच्या उगमाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या देशांच्या विरोधात चीनने कडक कारवाई सुरू केली होती. ऑस्ट्रेलियाने तशी मागणी केल्यानंतर चीनने याच्या गंभीर परिणामांचा इशारा देऊन ऑस्ट्रेलियावर व्यापारी निर्बंध लादले होते. पण आता मात्र अमेरिकन माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जोस बोल्सोनारो यांनी कोरोनाची साथ आलेली असताना जी२० संघटनेचा सदस्य असलेल्या एकाच देशाचा जीडीपी वाढला आहे, यावर बोट ठेवले होते. हा देश म्हणजे चीन असून ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली टीका चीनचा पर्दाफाश करणारी आहे. यानंतर काही दिवसातच चीनच्या लष्करी अधिकार्‍यांचे जैविक शस्त्रांचा वापर करण्याबाबतचे दावे जगासमोर आले.

गेल्या वर्षीही अमेरिका तसेच युरोपिय देशांमध्ये जगाला कोरोनाची ‘भेट’ देणार्‍या चीनच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी सुरू झाली होती. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले होते. मात्र अमेरिकेतील सत्ताबदलामुळे ही मोहीम मागे पडली. असे असले तरी चीननेच जाणीवपूर्वक ही साथ सर्वत्र पसरविली, असा समज जगभरात पसरलेला आहे. यामुळे जगभरात चीनच्या विरोधात वातावरण गेले असून बीजिंगच्या तिआनमेन चौकात घडविलेल्या नरसंहारानंतरही जगभरात चीनला इतका विरोध झाला नव्हता, असे एका चिनी अभ्यासगटानेच आपल्या सरकारला बजावले होते.

leave a reply