चीनने कोरोना उगमाच्या चौकशीची मागणी पुन्हा नाकारली

मागणीबीजिंग – कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्ये झाला, या मुद्यावर पुन्हा चौकशी करण्याची मागणी चीनने नाकारली आहे. गुरुवारी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नेे (डब्ल्यूएचओ), कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळातील ‘रॉ डाटा’ चीनने द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर चीनने नव्या चौकशीची गरज नसल्याचे सांगून मागणी धुडकावली आहे.

‘राजकीय उद्देशाने पुन्हा तपास सुरू करण्यास तसेच आधीचा अहवाल रद्द करण्यास चीनचा विरोध आहे. चीन व डब्ल्यूएचओच्या संयुक्त अहवालाला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली आहे. पुढे तपास करायचा असेल तर तो याच अहवालाच्या आधारावर हवा’, या शब्दात चीनचे परराष्ट्र उपमंत्री मा झाओशु यांनी नव्या चौकशीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

डब्ल्यूएचओ’ने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. त्यावेळी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीही त्याचे समर्थन केले होते. मात्र त्यानंतर गेल्या महिन्यात ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी ‘यु टर्न’ घेऊन पुन्हा चौकशीची तयारी दर्शविली होती. त्यासाठी चीनने अधिक पारदर्शकता व खुलेपणा पाळून साथीच्या सुरुवातीच्या काळातील ‘रॉ डेटा’ संघटनेकडे द्यावा, अशी आग्रही मागणीही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली होती. गुरुवारी त्याचा पुनरुच्चार करण्यात आला.

मात्र त्याला नकार देऊन चीनने कोरोनाच्या उगमाबाबत सारे काही आलबेल नसल्याच्या संशयाला अधिकच बळ पुरविल्याचे दिसत आहे.

leave a reply