‘एलएसी’वर लष्करी तैनाती करुन चीनने तणाव वाढविला

नवी दिल्ली – चीनने भारताच्या सीमेवर ६० हजार सैनिकांची तैनाती केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले तर अमेरिका भारताला सर्वतोपरी सहाय्य करील, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. त्याचवेळी चीनने भारताच्या सीमेलगत तिबेटच्या भूभागात अतिरिक्त ३० हजार सैनिकांची तैनाती करुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्य आणून ठेवल्याच्या बातम्या येत आहेत. चीनच्या या हालचाली भारतावर मानसिक दडपण टाकण्याचा डाव असण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. त्याचवेळी चीन ‘एलएसी’वर भारतीय सैनिकांकडून झालेली मानहानी धुवून टाकण्यासाठी नवी आगळीक करण्याची शक्यताही विश्लेषकांनी नाकारलेली नाही. मात्र चीनच्या या हालचाली व डावपेचांची जाणीव असलेल्या भारतीय संरक्षणदलांनी लडाखच्या ‘एलएसी’वर जबरदस्त तयारी करुन चीनला भारत युद्धासाठी तयार असल्याचे इशारे दिले आहेत.

अमेरिकन माध्यमांशी बोलताना परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जपानमध्ये झालेल्या क्वाड’च्या बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचा दाखला दिला. सर्वच क्षेत्रात अरेरावी करणार्‍या चीनने भारतालगतच्या सीमेवर ६० हजार सैनिक आणून ठेवले आहेत, असे पॉम्पिओ म्हणाले. चीनच्या युद्धखोरीपासून आपल्या मित्रदेशांना असलेल्या धोक्याची जाणीव अमेरिकेला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध पेटले तर अमेरिका भारताला सर्वतोपरी सहाय्य करील, असा संदेश अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. लवकरच भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांची टू-प्लस-टू चर्चा पार पडणार आहे. त्या चर्चेच्या आधी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करुन चीनवरील दडपण अधिकच वाढविले आहे.

लडाखच्या ‘एलएसी’वर कडाक्याच्या थंडीत चिनी सैनिकांचे हाल होऊ लागले असून आतापर्यंत कितीतरी चिनी सैनिक आजारी पडल्याचे वृत्त आहे. याबाबतच्या बातम्या बाहेर फुटू नये यासाठी चीनची कम्युनिस्ट राजवट प्रयत्‍नांची शर्थ करीत आहे. तरीही या बातम्या जगापासून लपून राहिलेल्या नाहीत. लडाखच्या ‘एलएसी’वर भारतीय सैन्याची तयारी पाहता, चिनी लष्कराला पुढे सरकणे शक्य राहिलेले नाही. त्याचवेळी ‘एलएसी’वरील हा संघर्ष चीनच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचा विषय बनला असून आता माघार घेणेही चीनसाठी अवघड बनले आहे.

मुख्य म्हणजे, गलवान खोर्‍यात चीनने केलेल्या विश्वासघातकी हल्ल्यामुळे संतापलेला भारत यावेळी चीनला कुठल्याही प्रकारच्या सवलती द्यायला तयार नाही. उलट सतत खोड्या काढणार्‍या चीनची खोड मोडायची या इराद्याने भारतीय लष्कर व वायुसेना आपली सज्जता वाढवित आहेत. ‘एलएसी’वरील भारतीय वायुसेनेच्या आक्रमक हालचाली चीनला चिंतेत टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर तिबेटच्या क्षेत्रात अधिक तैनाती करुन चीन ही समस्या सोडविण्याचा आपल्यापरीने प्रयत्‍न करीत आहे.

leave a reply