अमेरिकेच्या माजी व्यापारमंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर चीनचे निर्बंध

बीजिंग – अमेरिकेने हाँगकाँग मुद्यावरून चीनवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकेच्या माजी मंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. सहा अधिकार्‍यांव्यतिरिक्त ‘हाँगकाँग डेमोक्रसी कौन्सिल’ या अभ्यासगटालाही लक्ष्य करण्यात आले आहे. चीनच्या निर्बंधांमुळे अमेरिकेचे धोरण व निश्‍चय बदलणार नाही, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या प्रतिक्रिया जेन साकी यांनी दिली. चीनने वर्षभरात अमेरिकी अधिकारी व नेत्यांविरोधात निर्बंध लादण्याची ही तिसरी वेळ आहे.

अमेरिकेच्या माजी व्यापारमंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर चीनचे निर्बंधकाही दिवसांपूर्वी अमेरिकेने हाँगकाँगच्या मुद्यावरून अमेरिकी कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी हाँगकाँगमधील अनेक चिनी अधिकार्‍यांवर निर्बंधांचीही घोषणा केली होती. चीनने शुक्रवारी जाहीर केलेले निर्बंध अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे सांगण्यात येते. ‘अमेरिकेची कारवाई चुकीची असून चीनने त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी प्रतिबंधविरोधी कायद्यानुसार अमेरिकेच्या सात अधिकारी व गटांवर निर्बंध लादण्यात येत आहेत’, असे चीनच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले.

चीनने निर्बंध लादलेल्या अधिकार्‍यांमध्ये अमेरिकेचे माजी व्यापारमंत्री विल्बर रॉस यांचा समावेश आहे. निर्बंध लादलेल्यांमध्ये रॉस यांच्याव्यतिरिक्त ‘युएस-चायना इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन’च्या प्रमुख कॅरोलिन बार्थोलोम्यू, ‘काँग्रेशनल एक्झिक्युटिव्ह कमिशन ऑन चायना’चे माजी अधिकारी जोनाथन स्टिव्हर्स, ‘ह्युमन राईट्स वॉच-चायना’च्या प्रमुख सोफि रिचर्डसन यांच्यासह अ‍ॅडम जोसेफ किंग व डो युन किम यांचा समावेश आहे. या सर्वांना चीनमध्ये प्रवेश करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेच्या माजी व्यापारमंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर चीनचे निर्बंधया व्यक्तींव्यतिरिक्त ‘हाँगकाँग डेमोक्रसी कौन्सिल’ या अभ्यासगटावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनकडून अमेरिकी अधिकारी व गटांवर निर्बंध लादले जाण्याची वर्षभरातील ही तिसरी वेळ ठरते. या वर्षाच्या सुरुवातीला चीनने हाँगकाँगच्याच मुद्यावरून माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यासह 28 अमेरिकी अधिकार्‍यांवर निर्बंध लादले होते. त्यापूर्वी गेल्या वर्षी अमेरिकी सिनेटर मार्को रुबिओ व टेड क्रूझ यांच्यासह 11 जणांवर निर्बंध लादण्यात आले होते. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने नुकताच स्वतंत्र कायदाही मंजूर केला होता.

चीनने लादलेले निर्बंध म्हणजे खाजगी नागरिक व नागरी गटांना लक्ष्य करून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्हाईट हाऊसने दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वेंडी शेरमन पुढील काही तासांमध्ये चीनला भेट देणार असून त्या पार्श्‍वभूमीवर चीनने केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply