चीन हा ब्रिटनच्या सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका

- ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

मोठा धोकालंडन/बीजिंग – चीन हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी दिला. यावेळी त्यांनी ब्रिटनमधील कंपन्या व हॉस्पिटल्सवर चीनकडून मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असल्याचाही आरोप केला. गेल्या काही महिन्यात कोरोनासह इतर अनेक मुद्यांवरून ब्रिटन व चीनमधील संबंध ताणले गेले असून, ब्रिटनने चीनविरोधात अधिकाधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. गुप्तचर प्रमुखांचा इशारा त्याचाच भाग ठरतो.

ब्रिटनमधील एका अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ‘जीसीएचक्यू’ या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख फ्लेमिंग यांनी चीनच्या धोक्याकडे लक्ष वेधले. सायबरसुरक्षा व इतर क्षेत्रात ब्रिटनला सातत्याने नव्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असल्याचे फ्लेमिंग म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या औषध क्षेत्रातील कंपन्या व हॉस्पिटल्सवर मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असल्याचे सांगून या हल्ल्यांमागे चिनी हॅकर्स असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना साथीबरोबरच ‘ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न चिनी हॅकर्सकडून करण्यात येत असल्याचा दावाही फ्लेमिंग यांनी केला.

मोठा धोका

यावेळी ‘ब्रेक्झिट’नंतर ब्र्रिटनसमोर असणारी आव्हाने व धोक्यांबाबत बोलताना, चीन हा ब्रिटनच्या सुरक्षेला असणारा सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा ‘जीसीएचक्यू’च्या प्रमुखांनी दिला. हा इशारा देतानाच ब्रेक्झिटनंतरही सुरक्षेच्या मुद्यावर ब्रिटन व युरोपिय महासंघामधील सहकार्याचे स्वरुप बदलणार नाही, उलट ते अधिक मजबूत व व्यापक होईल, असे संकेत त्यांनी दिले. गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी चीनबाबत दिलेल्या इशार्‍याला ब्रिटनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला. ब्रिटनच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे प्रमुख जनरल सर पॅट्रिक सँडर्स यांनी, ब्रिटनच्या सुरक्षेला असणारा चीनचा धोका अतिशय तीव्र स्वरुपाचा असल्याचे बजावले.

2010 सालानंतर ब्रिटनने चीनबरोबर संबंध अधिक मजबूत व व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या होत्या. ब्रिटन व चीनमध्ये झालेल्या मोठ्या व्यापारी तसेच गुंतवणुकविषयक करारानंतर दोन देशांमध्ये ‘सुवर्णयुग’ सुरू झाल्याचे दावेही राजकीय नेते तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात दोन देशांमधील संबंध बदलण्यास सुरुवात झाली असून ब्रिटनने चीनबाबत अधिक आक्रमक धोरण स्वीकारले आहे. कोरोनाची साथ, साऊथ चायना सीमधील कारवाया, हाँगकाँगमधील कायदा, उघुरवंशिय, 5जी तंत्रज्ञान या मुद्यांवरून ब्रिटनने चीनच्या विरोधात उघड भूमिका घेत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ब्रिटनच्या या आक्रमकतेने चीन बिथरला असून ब्रिटनच्या नेतृत्त्वावर साम्राज्यवादी मानसिकतेचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चीनविरोधी निर्णय घेणार्‍या ब्रिटनला भयंकर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात धमक्याही दिल्या जात आहेत. मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या धोरणात बदल करण्यास नकार दिला असून उलट चीनविरोधी भूमिका अधिक व्यापक करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधील एका आघाडीच्या अभ्यासगटाने जॉन्सन सरकारला, ‘इंडो-पॅसिफिक’केंद्रित परराष्ट्र धोरण आखून चीनच्या प्रभावाला उघड आव्हान द्यावे, असा सल्लाही दिला होता.

leave a reply