चीनकडून अंतराळातील कचरा हटविणार्‍या तंत्रज्ञानाची चाचणी घेणारा उपग्रह प्रक्षेपित

अंतराळातील कचराबीजिंग – चीनने अंतराळातील कचरा हटविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाची चाचणी घेणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. रविवारी सकाळी ‘शिजियान-२१’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती चीनच्या यंत्रणांनी दिली. चीनने या वर्षात अंतराळात प्रक्षेपित केलेला हा ३९वा उपग्रह ठरला आहे. चीनकडून गेल्या काही वर्षात अंतराळक्षेत्रातील हालचालींना प्रचंड वेग देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी पाठविण्यात येणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण लक्ष वेधून घेणारी घटना ठरते.

रविवारी सकाळी सिचुआन प्रांतातील प्रक्षेपण केंद्रावरून ‘शिजियान-२१’ अंतराळात सोडण्यात आला. हा उपग्रह अंतराळक्षेत्रात ‘डेब्रिस मिटिगेशन टेक्नॉलॉजी’संदर्भातील चाचण्या घेईल, असे चिनी यंत्रणांकडून सांगण्यात आले. उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ‘लॉंग मार्च-३बी’ कॅरिअर रॉकेटचा वापर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. चीनने या वर्षात अंतराळक्षेत्रात केलेले हे ३९वे प्रक्षेपण असून वर्षअखेरपर्यंत अजून किमान दोन मोहिमा बाकी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

च्या अंतराळसंस्थेने २०१५ साली ‘स्पेस डेब्रिस मॉनिटरिंग ऍण्ड ऍप्लिकेशन सेंटर’ची उभारणी केली होती. नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण या केंद्राकडून राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा भाग मानला जातो. मात्र चीनचे अंतराळक्षेत्र देशाच्या संरक्षणदलांशी जोडलेले असल्याने या मोहिमांचा उद्देश दुहेरी वापराचा असू शकतो, असे दावे विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांकडून करण्यात येतात. काही वर्षांपूर्वी चीनने सोडलेल्या ‘शिजियान १७’ या उपग्रहाच्या क्षमतेबाबत अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे प्रमुख जॉन विल्यम रेमंड यांनी इशारा दिला होता.

विविध तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी पाठविण्यात येणारे चिनी उपग्रह इतर देशांचे उपग्रह तसेच यानांची हानी करू शकतात, अशी भीती यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. चीनकडून अंतराळात सोडण्यात आलेली रॉकेट्स, यान तसेच उपग्रह संशोधनाबरोबरच टेहळणी व लष्करी कारणांसाठी वापरण्यात येत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेनेही चीनच्या अंतराळातील हालचालींबाबत बजावणारा अहवाल काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केला होता.

अमेरिकेतील विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी, चीनच्या अंतराळातील महत्त्वाकांक्षांकडे लक्ष वेधून त्यामुळे अंतराळात ९/११ घडू शकते, असा खळबळ माजविणारा इशारा गेल्या वर्षीच्या अखेरीस दिला होता.

leave a reply